दूरदृष्टी असते. अशी उदारता हे बाबूराव धारवाडे यांच्या चित्र व चरित्राचं वेगळेपण मनावर ठसवते.
बाबूराव धारवाडे हे काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते पण सत्तेच्या राजकारणापेक्षा पक्षांच समाजकारण त्यांना अधिक भावत आलं. पक्ष, निवडणुका, शहकाटशह यापेक्षा ते समाज निर्मिण्यावर अधिक भिस्त ठेवतात. नाही म्हणायला ते एकदा विधान परिषदेवर निवडून गेले. त्याच्या निधीचा विनियोग त्यांनी आपला सारा निधी कोल्हापूर महानगरपालिकेस एकरकमी देऊन नवा वस्तुपाठ सादर केला. गल्लीबोळातून आमदार निधीची खिरापत वाटणारे ते सवंग पुढारी झाले नाहीत, याचा मला मोठा आनंद वाटतो. कार्यकर्त्यांचे मतभेद ते उमदेपणाने स्वीकारतात. मतभेदाने मनभेद होणार नाही याची ते काळजी घेतात. एका प्रश्नात त्यांचे नि माझे उघड मतभेद झाले. पण ते वजा करून त्यांनी सतत माझ्याबद्दल प्रशंसेचा भाव ठेवला. मनाचं असं मोठेपण समकालीन कार्यकर्त्यांत अपवादानं दिसतं.
राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट व भाई माधवराव बागल विद्यापीठामार्फत ते दोन पुरस्कार प्रतिवर्षी देत असतात. या पुरस्कारांची सतत वाढत जाणारी पत ही बाबूराव धारवाडेंच्या चोखंदळपणाची चुणूकच. त्यामागे पुरोगामी विचार रुजवण्याची त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. भाई माधवराव बागलांचे समग्र साहित्य, जीवन, कार्य, कला, राजकारण, समाजकारण यांचा समग्र अभ्यास अद्याप झालेला नाही. बाबूराव धारवाडे यांनी आपल्या विद्यापीठामार्फत याचा पाठपुरावा करायला हवा. गॅझेटचा केला तसा. छ. शाहू महाराज, भाई बागल यांच्या जीवनकार्याचा वारसा ते सध्या सागर शिक्षण मंडळामार्फत नव्या पिढीत प्रतिबिंबित करताना दिसतात. त्यात एक विशिष्ट दृष्टी दिसून येते. नानासाहेब गद्रे व भाई बागल स्मारक व्याख्यानमालेतून ते आपल्या प्रेरकांची प्रेरणा जिवंत ठेवतात. तिथं महाविद्यालय सुरू व्हावं असं त्यांचं स्वप्न आहे. ते साकार झालं तर त्यांचं भाई माधवराव बागल विद्यापीठ हे खऱ्या अर्थानं प्रबोधनाचे औपचारिक अभिमत विद्यापीठ बनू शकेल.
बाबूराव धारवाडे यांना कार्यकर्त्यांच्या मोहोळात सतत रुंजी घालायचा छंद. पुरोगामी कार्यकर्ता हा त्यांच्या जीवनाचा चरमबिंदू. अशा माणसांचं मोहोळ त्यांच्या भोवती सतत पिंगा घालत राहतं. त्याचा उपयोग ते कुणाला इंगा दाखवण्यासाठी करताना दिसणार नाहीत. शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी असा संघर्ष त्यांच्या कार्यात अनेकदा उभा राहिला.