पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सन १९८० नंतरच्या काळात ते येथील राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते त्या काळात ट्रस्टचे अनेक उपक्रम मी जवळून पाहिले, ऐकले. त्या काळात बाबूराव पक्ष नि प्रबोधन अशी दुहेरी कसरत करत असत. पुढे त्यांनी पक्षाशी संपर्क ठेवून प्रबोधन हेच आपलं जीवित कार्य मानलं व ते विविध व्याख्याने, मेळावे, शिबिरात अधिक रमू लागले. आता त्यांना स्वतःचा स्वर सापडला. ते भाई माधवराव बागल विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सक्रिय झाले नि त्यांनी शाहू स्मारक भवनला प्रबोधनाचं सजग व्यासपीठ बनवलं. हे सारं विस्ताराने मी अशासाठी सांगतोय की बाबूराव धारवाडे हे जन्मलेले कार्यकर्ते नव्हते. त्यांचे कार्यकर्ता म्हणून असलेलं व्यक्तिमत्त्व घडत गेलं. त्या घडणीत त्यांच्या जीवन संघर्षाचा मोठा वाटा आहे. त्यांचा जन्म झाला तो काळ भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा होता. देशात ‘सविनय अवज्ञा आंदोलन' जोर धरू लागलं होतं. ते कुमारवयात असताना त्यांनी भारत छोडो आंदोलन कुतूहलाने पाहिलेलं. ते धोक्याच्या वयाचा उंबरठा ओलांडत असतानाच्या काळात देश स्वतंत्र झाला. देश प्रजासत्ताक होत असतानाच्या काळात त्यांना मिसरूड फुटत होती. व्यक्तिगत जीवनात जन्म-मरणाचा प्रश्न सोडवत ते देशाची तगमग अनुभवत होते. त्या वेळचं गोखले महाविद्यालय म्हणजे बहुजन समाजातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांचं आशास्थान होतं नि आधारवडही. डॉ बाळासाहबे खर्डेकर आणि प्रा. एम. आर. देसाई यांनी तरुण बाबूरावांमधील धडाडी पाहून त्यांच्या शिक्षणाचा विडा उचलला. अन्यथा, त्या वेळच्या ओढग्रस्त स्थितीत शिक्षण घेणं हे दिवास्वप्नच होतं. विद्यार्थी चळवळीत सतत पुढे असणारे बाबूराव क्रीडांगणावरही तळपत राहायचे. फुटबॉल, क्रीकेट हे त्यांचे आवडते खेळ. या खेळात तारुण्याची रग मुरवत ते नेतृत्वाचे प्राथमिक धडे घेत राहिले. गोखले महाविद्यालयाने त्यांच्या कप्तानपदाच्या काळात दाभोळकर शील्डवर सतत कब्जा मिळविला.

 शिक्षण पूर्ण करताच ते लोकल बोर्डात रुजू झाले. पंचायत राज्य व्यवस्थेच्या झुंजुमुंजूच्या काळात तलाठी, ग्रामसेवकांशी त्यांचा निकटचा संबंध आला. ग्रामीण समाजाचे प्रश्न त्यांनी जवळनू अभ्यासले याच काळात त्यांना लेखनाचा नाद लागला. लोकशाहीचे विकेंद्रीकरण' हा त्या वेळचा परवलीचा शब्द. प्राचार्य मा.पं.मंगडूकर व प्राचार्य पी. बी. पाटलांच्या वाचन, वक्तृत्व नि वाङ्मयाने बाबूराव धारवाडेंमधील तरुण कार्यकर्ता भारावला. लोकल बोर्डातील आकडेमोडीत त्यांचे लक्ष लागेना.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१३४