शाहूप्रेमी समाजसेवक : बाबूराव धारवाडे
सन १९७० ची गोष्ट असावी. मी महाविद्यालयात शिक्षण घेत होतो. गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठातील रा. वि. परूळेकर ग्रंथालयात रोजची वृत्तपत्रे वाचत असताना नित्य जनसामान्यांचे काही ना काही प्रश्न घेऊन लढणारी जनसेना नावाची संघटना वर्तमानपत्रात रोज डोकावत असायची. तिचे संघटक म्हणून बाबूराव धारवाडे यांचे नाव असायचे.
जनसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून तेव्हापासून माझ्या मनात कुतूहल असायचं. पुढे मी शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी म्हणून कोल्हापुरात आलो. तत्पूर्वीही कोल्हापुरात येणे जाणे होत राहायचे. त्या काळात महागाई शिगेला पोहोचली होती. रेशनच्या कार्डावर मिलो (निकृष्ट प्रतीची ज्वारी, ती काळसर असायची, नाचण्यापेक्षा थोडी मोठी.) मिळवायला पण लोकांची काय झुंबड! साखर ग्रॅममध्ये मिळायची. ती मिळवायला पण मोठी यातायात करावी लागायची; हे आजच्या पिढीला सांगू खरे वाटणार नाही. त्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी जनसेना दलाचे कार्यकर्ते सायकल फेरी काढायचे. अशा एका फेरीत मी पहिल्यांदा बाबूराव धारवाडे यांना पाहिलं. त्या फेरीत वारकऱ्याप्रमाणे मी उत्स्फूर्तपणे सामील झाल्याचंही आठवतं. बाबूराव धारवाडे यांच्याबद्दल माझ्या मनात केलेल्या घराचं एकच कारण होतं, नि ते म्हणजे जनसामान्यांशी नाळ जोडायचा त्यांचा खुळा नाद.
पुढे मी स्वावलंबी झालो नि माझी उठबस थोरा-मोठ्यातं होऊ लागली. अनाथ, निराधारांच्या संगोपन, पुनर्वसन कार्याच्या निमित्ताने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षकांशी रोजचा संपर्क असायचा.