ही त्यामागची कल्पना. या चळवळीचं बोध वाक्य म्हणून त्यांनी ‘सा विद्या या विमुक्तये'ची निवड केली. त्यांना मुळात ज्ञान हे सामान्यांसाठी मुक्त करायचं होतं. शिवाय विद्यादानाला लाभलेलं 'रहस्यवलय' त्यांना छेदायचं होतं. त्यासाठी त्यांनी गट शिक्षणाचे तंत्र अवलंबिलं. गटाचे गोफ गुंफले व त्यातून जगभर त्यांचा प्रयोग परिवार साकारला. ते ‘प्रयोग-माऊली' बनले. स्वायत्त,स्वाश्रयी, स्वयंशोधी, मुक्त, विकेंद्रित, वैज्ञानिक कार्य कुले विकसित करून अनौपचारिक विद्याशाखा विकसित करण्यावर त्यांचा भर असायचा. सूर्यकिरणांची सुगी साधणारं, पृथ्वीस पोशिंदा बनविणारं त्यांचं शिक्षण होतं. वर्तमान शिक्षणाला छेद देणारं नि म्हणून प्रयोगशील होतं.
शेती हा सरांचा जिव्हाळ्याचा विषय. लोक नेहमी नसणाऱ्या गोष्टीचं रडगाणं गातात. सरांनी असणाऱ्या गोष्टींच्या द्रष्ट्या उपयोगाचं तंत्र अवलंबिलं. एक शेतकरी सरांकडे आला. म्हणाला, "जमीन सारी कातळ आहे. काही उपाय सुचवा." सरांनी जागा पाहिली. १'१' खड्डे खणून पपई लावायची शिफारस केली. एक पपईचं झाड आपल्या पानांच्या घेराइतकी जमीन भुसभुशीत करतं, हे समजून सांगितलं. वर्षाला खड्डे बदलायचे नि लागवड करायची. तीन वषार्तं साऱ्या रूपांतर मुरमाड जमिनीत झालं. पुढे पिकांची पालट व पाल्याच्या वापरानं याच कातळाची मळीची जमीन झाली, हे दाभोळकरच करू जाणे.
खेड्यात लोक शेतीमध्ये खतावर भरपूर पैसा खर्च करतात. त्यामुळे जमिनीचा पोत घसरतो, हे लक्षात येऊन सरांनी ‘तण देई धन'चा प्रयोग राबवला. झाड, पाला, रोग, मूत्र साऱ्यांचा नियोजनबद्ध वापर त्यांनी शेतकऱ्याला शिकवला. द्राक्षशेती प्रयोगातही हे तंत्र त्यांनी अवलंबिलं. द्राक्ष बागायतदार प्रारंभी एकरी सहा टन खत वापरायचे तेही रासायनिक. दाभोळकरांनी द्राक्ष छाटणीतील काड्या, पानं, बागेत उगवणारं तण तिथंच कुजवून खताच्या बचतीचं व स्वयंनिर्मितीचे तंत्र विकसित केलं.
शेती नि पाणी, शेती नि माती असं कृषिविषयक सूत्र दाभोळकरांनी छेदून दाखविलं. मातीविना शेती हा सध्या पाठ्यक्रमात असलेला विषयही दाभोळकरांच्या प्रयोगाचीच फलनिष्पत्ती होय. माती हे जीवरस पुरविण्याचं माध्यम आहे. ते नसेल तर अन्य माध्यमं- गवत, भाताचे तुस, उपलब्ध पालापाचोळा काहीही वापरून ते पुरविता येतं, हे त्यांनी सप्रयोग करून दाखवून दिलं. कमी पाण्यात भरपूर उत्पादनासाठी त्यांनी 'बास्केट' व 'पॉट' मिळून ‘बापू कुंडी' विकसित केली.