पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांच्या कार्याचा वाटा महत्त्वाचा. आज शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ही तिन्ही महाविद्यालये गुणवत्ता शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहेत. या तीनही महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते कणबरकर सर. सद्गुरू गाडगे महाराज विद्यालय, कराड, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर आणि न्यू कॉलेज, कोल्हापूर. ज्या महाविद्यालयांना कुशल प्राचार्य लाभतात त्यांचा कायापालट होतो.
 प्राचार्य म्हणून कार्य करत असताना ते शिवाजी विद्यापीठाच्या विविध सभा, समित्यांवर कार्यरत राहिले. त्यांनी विद्यापीठ कायदे व उपविधी तयार केले. तसेच अभ्यासक्रम व क्रमिक पुस्तकेही! एकाच वेळी शिक्षक व प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक विकसित होत गेला. त्याची परिणती म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी केलेली नियुक्ती.
 कणबरकर सरांनी प्राध्यापक, प्राचार्य म्हणून पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रात कार्य केले होते. अन्य विद्यापीठांचे कार्य त्यांना माहिती असल्याने कुलगुरु म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठ विकासाची योजना आखली. सन १९८० ते १९८३ या अवघ्या तीन वर्षांत त्यांनी शिवाजी विद्यापीठात ललित, कला, संख्याशास्त्र आणि प्रौढ व निरंतर शिक्षण विभाग सुरू केले. उच्च शिक्षणात त्यांनी काळाची पावले ओळखून विकेंद्रीकरणाचे धोरण अवलंबले व सोलापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू केले. त्यांचा भर शिक्षण विस्तारावर होता. नोकरी व संसारात गुंतलेल्या प्रौढ स्त्री-पुरुषांना बहिस्थ शिक्षणाची सोय केली पाहिजे हे ओळखून प्रौढ व निरंतर शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण व शिक्षणशास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम दूरशिक्षणाने करता येण्याची सोय केली. बेरोजगार युवकांसाठी सेवा सल्ला केंद्र सुरू केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार निरंतर अंतगर्त मूल्यमापन पद्धतीचा स्वीकार केला. या कार्यकालात प्रा. कणबरकरांनी डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कार्यकालात सुरू झालेले परंतु मधल्या काळात बंद पडलेले शाहू संशोधन केंद्र पुन्हा सुरू केले. यातून राजर्षि शाहू छत्रपतींच्या विषयीचा त्यांचा आदर स्पष्ट होतो. त्यांच्या या कार्यकालातच शाहू जन्मशताब्दीच्या निमित्ताने राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची स्थापना झाली. त्याचे कुलगुरु या नात्याने ते पदसिद्ध विश्वस्त बनले. ते निवृत्तीनंतर समाज प्रतिनिधी विश्वस्त बनले.

 निवृत्तीनंतरही त्यांचा अनेक शैक्षणिक संस्थांशी घनिष्ठ संबंध राहिला. ताराराणी विद्यापीठाचे ते कार्याध्यक्ष तर विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१२६