पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आईच्या मृत्यूनंतर ‘मनोरमा महिला व बाल उत्कर्ष विश्वस्त कुंज' स्थापन करून त्यांनी हे स्पष्ट केले. लीलाताईंच्या प्रत्येक कृतीमागे दीर्घ चिंतन, सूक्ष्म नियोजन व भविष्यवेधी लक्ष्य असतं. व्यक्तिगत दुःखाचं सामाजिक उन्नयन हा त्यांच्या जीवन पद्धतीचा अविभाग्य भाग होय.
 घरातला कर्त्या वयाचा मुलगा गेला म्हणून लीलाताई कधी हळहळत बसल्या नाहीत. त्यांनी जगाची मुलं गोळा केली व त्यांना शिकवलं. आपल्या बदलीच्या नोकरीत मुलास न्याय देता न आल्याचं शल्य त्यांनी असं व्यापक कृतीनं दूर केलं. आईच्या नावे पुरस्कार सुरू केला तो आईच्या व्यक्तिगत आयुष्यातील परवड लक्षात घेऊन.
 लीलाताईंचा नि बापूसाहेबांचा संसार प्रेमविवाहाने सुरू झालेला. त्या काळात अनेक कार्यकर्त्यांच्या पत्नींनी संसार सांभाळायची एक रीतच रूढ झाली होती. बापूसाहेबांच्या प्रत्येक कामास लीलाताईंनी पाठबळ दिलं नि अर्थबळही पण केलेल्याबद्दल न बोलण्याचा कटाक्ष लीलाताई कशा आजन्म पाळू शकतात हे मला अद्याप न उमजलेलं एक कोडे होय.
 स्वतःला एखाद्या कामात गाडून घेतलेली माणसं बहुधा विक्षिप्त, एकसुरी जीवन जगतात. जीवित कार्यापलीकडचं जग त्यांना फारसं माहीत असत नाही. लीलाताईंचं तसं नाही. शिक्षण म्हणजे बालशिक्षण एवढीच त्यांची समज नाही. विविध शिक्षण आयोगांचा त्यांचा अभ्यास, उच्च शिक्षणाबद्दलचं त्यांचं चिंतन हे त्यांच्या शिक्षणविषयक विस्तारलेल्या क्षितिजाचंच निदर्शक होय. शिक्षणापलिकडे साहित्य, संगीत, कला, निसर्ग, बागकाम, गृहशोभन, आधुनिकता, स्त्री-मुक्ती, समाज अशा कितीतरी विषयात त्यांना गती नि रुची आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषांची त्यांना चांगली जाण आहे. या भाषांतील साहित्याचे वर्तमान प्रवाह त्या चांगल्या जाणतात. त्यांच्याशी फोनवर बोलतानाही त्या मला जिज्ञासू असल्याचं वारंवार जाणवलं. आपल्याला माहीत नाही ते विचारण्यात त्या संकोचल्या तर कधीच नाहीत पण आपण ज्यास विचारतो तो त्यातला दर्दी असल्याची दाद देण्याची त्यांची अदा पाहिली की, त्यांच्यातील संस्कारित प्रगल्भता लक्षात यायला वेळ लागत नाही.

 मराठीतील'साजणवेळ असो किंवा उर्दूतील 'कैफियत' साऱ्या ध्वनीफितींची त्यांना जाण असते. त्यांचं घर हे त्यांना गृहशोधनाची कशी दृष्टी आहे याचं सुंदर प्रतीक!

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/११६