पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/116

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्यातील कृतिशील शिक्षक लीलाताईंनी जागवला. द्रोणाचार्यांनी एकलव्याला कधी प्रत्यक्ष शिकवलं नाही, तरी त्याचं प्रेरणास्रोत द्रोणाचार्यच होते. लीलाताई हे माझे प्रेरणास्रोत! औपचारिकपणे नि अनौपचारिकपणे, प्रत्यक्ष नि अप्रत्यक्ष शिकवणारे, समजावणारे अनेक असतात. त्यापैकी ब-याचदा अनौपचारिकपणे नि अप्रत्यक्षरित्या जे शिकवतात, समजावतात, त्यांच्याकडून आपण अजाणतेपणे जे घेत असतो, त्यात सहजता असते. सहजतेनी झालेली रुजवण अधिक परिणामकारक असते. लीलाताईंच्यामधील ‘शिक्षक' असा दीर्घजीवी सर्जनात्मकता जोपासणारा आहे. याची मला सतत प्रचिती येत राहिली आहे.
 मी डिप्लोमा इन रुरल सर्व्हिसेस (एज्युकेशन) पाठ्यक्रम पूर्ण करून औपचारिक शिक्षक झालो नि ‘आंतर भारती'त रुजू झालो. १९७३ मध्ये त्या श्रीमती महाराणी ताराबाई अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य' म्हणून रुजू झाल्या. त्यांच्या येथील प्राचार्य' म्हणून १९८५ पर्यंतच्या कार्यकालात सेवांतर्गत प्रशिक्षण, शिक्षण विस्तार कार्यक्रम, विविध उपक्रमात त्यांचं औपचारिक, अनौपचारिक मार्गदर्शन लाभत राहिलं. या साऱ्या प्रवासात त्यांची माझी प्रत्यक्ष ओळख झाली ती १९८५ मध्ये. त्यांच्या अध्यापक महाविद्यालयांचे ते 'सुवर्णमहोत्सवी वर्ष' होते. अनेक उपक्रमात त्यांनी एक उपक्रम योजला होता चर्चासत्राचा. विषय होता ‘मला लाभलेले पालकत्व. वक्ते होते प्रा. मंदाकिनी खांडेकर, वि.स.खांडेकरांसारखं समृद्ध पालकत्व त्यांना लाभलं होतं. दुसरे होते ‘उपराकार लक्ष्मण माने- आपल्याला लाभलेल्या उपेक्षित पालकत्वाबद्दल ते बोलले. मी असा वक्ता होतो की मला पालकत्वच लाभलेलं नव्हतं. अनाथ म्हणून मी काय बोलणार याकडे लीलाताईंचं अधिक लक्ष होतं, असं माझ्या लक्षात आलं. इतरांचे पालक लादलेले होते. मला लाभलेले पालकच मी सांगितले. परिसंवाद समोर बसून ऐकणाऱ्या लीलाताईंच्या डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा मला आजही आठवतात. लीलाताईंचा ‘कठोर प्रशासक म्हणून त्यांचा अधिक गवगवा झाला. त्यांच्यातील सजग, संवेदनशील शिक्षकाची मात्र सतत उपेक्षाच झाली. गेल्या तपभराच्या निकट सहवासात मला समजलेल्या लीलाताई या त्यांच्या सर्वपरिचित ओळखीपेक्षा कितीतरी वेगळ्या आहेत.

 लीलाताईंच्या व्यक्तिगत आयुष्यात संतुलित पालकत्व लाभलं नाही. त्याची खंत त्यांनी कधी व्यक्त केलेलीही मी ऐकली नाही. वडिलांबद्दल त्या नेहमी आदरानेच बोलत आल्या. आई मनोरमाबाईंच्याबद्दल त्यांच्या मनात विशेष जागा होती.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/११५