सृजनानंदी शिक्षिका : प्राचार्या लीला पाटील
लीलाताईंना मी सर्वप्रथम पाहिलं ते १९६३-६५ च्या दरम्यान, आंतरभारती विद्यालय नुकतंच सुरू झालेलं. बी. टी. कॉलेजच्या विद्यार्थांचे पाठ निरीक्षण करायला त्या विद्यार्थी घेऊन यायच्या.
आम्ही आठवी-नववीची मुलं. पाठ झाला की त्या आमच्या शिक्षकांना (त्यांच्या विद्यार्थांना) काही सांगायच्या. त्यातलं फारसं कळायचं नाही पण त्यांच्या बोलण्यात चांगलं, रंजक , क्रियात्मक शिकवण्याबद्दलचं सांगणं असायचं. ऐकत असताना आमच्या मनातलं या बाईंना कसं कळतं, अशी माझी जिज्ञासा असायची. आज माझ्या लक्षात असं येतं की, सृजनात्मक नि आनंददायी शिक्षणाचा त्यांनी चालविलेला प्रयत्न हा काही शोध किंवा प्रयोग नव्हे. अध्ययन, अध्यापनाच्या प्रवासातील चिंतनातून उमजलेला तो शिक्षणविषयक आचार नि विचार होय. काहीतरी नवे करा म्हणून केलेला तो उद्योग नव्हे, तर शिक्षणविषयक चिंता नि चिंतनाची ती इतिःश्री होय!
पुढे मी 'आंतरभारती'मधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झालो. पुढील शिक्षणासाठी गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे डी.आर.एस.(एज्युकेशन) ही बी. ए., बी. एड. समकक्ष पदविका पूर्ण करताना शिक्षणशास्त्र विषयावरील लीलाताईंचे पुस्तक त्या वेळी सर्व विद्यार्थी आवर्जून अभ्यासायचे. अन्य लेखकांची पुस्तके शिक्षणशास्त्राचा विचार सांगणारी होती. शिक्षकाचा आचारधर्म सांगणारं, शिक्षण शास्त्रामागील शिक्षकाची सृजनात्मकता जागवणारं त्यांचं पुस्तक लीलाताईंच्या त्या 'मेथड मास्टर'च्या विवेचनांचा अर्थ सांगत गेलं.