पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर्कशुद्ध विचार विवेचन हा या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यवच्छेदक असा पैलू! याची जाण अनेकांना असल्याचं समाधान कोणास कधी मिळले असं वाटत नाही. पक्षकार्य ही त्यांची जीवननिष्ठा होय. वकिली ही त्यांची जीविका. या फारकतीमुळे हा कार्यकर्ता कणा नि-मान ताठ करून सतत निधड्या छातीनिशी उभ्या असलेल्या अजेय योद्ध्याप्रमाणं सतत झगडताना दिसतो.

 भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाल्यानंतरच्या अनौपचारिक प्रतिक्रियेत हा सामूहिक कार्याचा व्यक्तिगत गौरव असला तरी त्यात तुमचाही वाटा आहे, असं जेव्हा पानसरेंना म्हणताना मी ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे काही एरंडाचं झाड नाही. असेलच तर अक्रोडाचं. ज्याला संयम आहे, शालीनता आहे, त्याचबरोबर कणखरताही असाच एक माणूस हे करू शकतो. यश पचवायची मानसकिता लाभलेला हा कार्यकर्ता म्हणून मोठा वाटतो, कारण आपलं मोठेपणा दुस-यात दडल्याची यास जाण असते. एक निगर्वी, समाजशील माणूस म्हणून त्यांच्याबद्दल प्रत्येकास आदर वाटतो तो, ते कुणाचा कधी अनादर करत नाहीत म्हणून. त्यांच्याकार्यतृत्वाचा गौरव, मूल्यमापनाचं निमित्त पुरस्कार हे आहे. मी पक्षकार्यकर्ता नाही. त्यांचा-माझा संपर्कही फारसा नाही नि नसतो. पण त्यांच्याबद्दल मला का वाटत राहतं, असा प्रश्न मी मलाच विचारत राहतो, तेव्हा लक्षात येतं की जात, धर्म, पक्षविचार यांच्या पलीकडे जाऊन पानसरे प्रत्येक समाज घटकास स्वीकारतात. प्रत्यके माणसात घेण्यासारखं असतं, अशी उदारमतवादी धारणा या माणसाच्या व्यवहारात आढळते. पानसरे इतर कम्युनिस्टांसारखे कसे नाहीत, हा मित्राने मला केलेला प्रश्न! या प्रश्नाचं उत्तर हेच खरं त्यांच्या जीवन व कार्याचं न सुटणारं गणित! कळूनही न आकळणारं! आचरणास कठीण!

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/११०