पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जपला, जोपासला. आपण कधीकाळी वंचित होतो याचं भान ठेवत ते सतत ‘उपेक्षितांसाठी शिक्षण' ध्यास ठेवून योजना आखतात. त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय उघडायला, शिक्षणाचा बाजार मांडायला रयतेतही विरोध केला. त्यापेक्षा त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणं पसंत केलं. महाग शिक्षण घेऊन नोकरीस महाग होणारी सुशिक्षित बेरोजगारांची फलटण तयार करणारे कारखाने त्यांनी सुरू केले नाहीत. ‘पब्लिक स्कूल' धर्तीची शिक्षण केंद्र सुरू करण्याऐवजी त्यांनी आश्रमशाळा उभारल्या. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळेचं त्यांनी जाळं उभा केलं. नापासांची शाळा सुरू करून ‘एन.डींनी शिक्षण वंचितासांठी ज्ञानोदय विद्यालय सुरू केलं. बहुजन विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केली. स्पर्धा परीक्षा केंद्रांवर भर दिला. मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबवली. दुर्बल शाखांसाठी विकास निधी जमवला. महषी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन सरू करून विठ्ठल रामजी शिंदेंच्या उपेक्षेची भरपाई केली. आपल्या शिक्षण संस्थांच्या खऱ्या समृद्धीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी सुरू करून शैक्षणिक प्रकाशने रुजवली. डॉ. आंबेडकर प्रबोधिनी, समाजवादी प्रबोधिनी, अधंश्रद्धा निर्मूलन समिती सर्वांच्या माध्यमातनू त्यांनी पुरोगामी आचार, विचार रुजवला. त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यांची नोंद घेऊन त्यांना अनेक विद्यापीठांनी डी. लिट. पदवी बहाल केली. अनेक पुरस्कार त्यांना लाभले. असे असले तरी त्यांची अनेक स्वप्नं अद्याप पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहेत.

 संकटग्रस्तात अनाथांना अभय देणारं नंदनवन, गोकूळ त्यांना सुरू करायचं आहे. शासकीय अनुदानाशिवाय लोकवर्गणीतून ते चालवावं अशी त्यांची जिद्द त्यांच्या भविष्यलक्ष्मी वृत्तीचं प्रतीक होय. एन. डी. पाटील यांचं समग्र कार्य, कर्तृत्व, विचार म्हणजे भोगलेल्या दैन्य, दुःखांचं विधायक उदात्तीकरण होय. एनडीचं मोठेपण यातच दिसतं की ते भूतकालीन भोगात स्मरणकातर न होता त्यातल्या वेदनांची विधायक, रचात्मक, सर्जक फलश्रुती कशी होईल याचा त्यांना ध्यास असतो. म्हणून ते केवळ आक्रस्ताळी गरळ ओकत नाही राहात. ते रचनात्मक पर्यायाच्या शोधात असतात. आपल्या पूर्वसुरींबद्दल ते कृतज्ञपणे भरभरून बोलत राहतात. ही असते त्यांची ऋजुता. ते विरोधकांवर तोफ डागतात. त्यांना वैचारिकदृष्ट्या नेस्तनाबूत करतात. प्रस्थापितांजागी विस्थापित, वंचित, उपेक्षित आले पाहिजे म्हणून ते धोरणात्मक रचना करतात. मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद इ.ची घोषणा न करता ते त्या विचारांनाच आपला आचारधर्म, आपली आचारसंहिता

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१०५