पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निर्भय सत्याग्रही : प्रा. डॉ. एन. डी. पाटील

 आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रबोधनाचे प्रवक्ते' म्हणून अग्रभागी आहेत. त्यामागे कार्य सातत्य, विचारांची स्पष्टता, ध्येयावरील निष्ठा व सतत समाजास जागृत ठेवण्याची धडपड दिसून येते. या साऱ्या मागे आपण कधीतरी वंचित, उपेक्षित असल्याची जाण असते.
 प्रा. एन. डी. पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील. ढवळी या छोट्या गावी ते जन्मले. घरची गरिबी, आई-वडील, आजी-आजोबा निरक्षर, आजोबांनी आपल्या दोन्ही नातवांना एकदमच शाळेत घातले. जन्म, मृत्यूची नोंद सक्तीची असण्याचा तो काळ नव्हता. स्वातंत्र्यपूर्ण काळातील अर्थी शिक्षणेच्छू पिढी जून-जुलैमध्ये जन्मली. एनडी त्यापैकी एक. १५ जुलै ही त्यांची जन्मतारीख तशी सार्वत्रिक. विठ्ठल, मारुती मंदिरात लोकांचं येणं जाणं, घंटानाद (कधी कधी शंखनादही) यात भरणाऱ्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं.

 तो काळ भटा-बामणांच्या शिक्षणाचा. कुणब्याच्या पोरानं गुरं राखायची अशी आजोबांची धारणा. पण हा दरिद्री नारायण ज्ञानश्रीमतं होता खरा. आजोबांनी गुरुजींकडे साकडं घालून लकडा लावून या नारायणास हायस्कूलात धाडलं. इथं एन. डी. पाटील यांना खैरमोडे नावाचे शिक्षक भेटले नि त्यांचं जीवन बदलून गेलं. खैरमोडे सर वाचन वेडे. एन. डींनी त्यांच्याकडून वाचन संस्कार घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या विचारांच्या संस्कारांनी त्यांना सामाजिक बनवलं. तो काळ ‘भारत छोडो' आंदोलनाचा होता.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१०२