जिल्हा परिविक्षा व अनुसंरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलाच्या आजच्या वैभवशाली रूपाचे शिल्पकार दादाच. सुरुवातीस आश्रयदाते म्हणून दादांनी संस्थेच्या कार्याविषयी आस्था व्यक्त केली. संस्थेचे तत्कालीन मानद कार्यवाह प्रा. एन. जी. शिंदे हे दादांच्या कामाविषयी जाणनू होते. त्यांनी सन १९५७ मध्ये आपले साहाय्यक म्हणून निवडले त्या वर्षीपासूनच दादांनी सह कार्यवाह म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. १९६० साली प्रा. एन. जी. शिंदे यांच्या अकाली निधनाने संस्थेच्या मानद कार्यवाहपदाची जबाबदारी दादांवर येऊन पडली, ती आजवर. गेल्या २५ वर्षांत दादांनी डॉ. राधाकृष्णन् बालगृहाचे विस्तारित बांधकाम, कन्या अभिक्षणगृहाचा प्रारंभ व भवन निर्माण, अनिकेत निकेतनची स्थापना, बाल मार्गदर्शन केंद्राचा प्रारंभ करून संस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकला. आज संस्था उत्कर्षाच्या ज्या शिखराप्रत पोहोचली आहे त्यात दादांची चिकाटी वाखाणण्यासारखी आहे.
प्रा. डी. एम. चव्हाण हे तसे विज्ञानाचे शिक्षक, पण उर्दूवर त्यांची मास्टरी होती. ते एस.एस् सी बोर्डाचे अनेक वर्ष मॉडरेटर होते. आपलं काम चोख करायचा. त्यांचा रिवाज होता. सेवादलातील आपल्या मित्रांसोबत ते हॉटेल व्यवसायात आले. त्यावेळी पद्मा, सेरेकन, ओपल ही होटेल्स कोल्हापूरी जेवणासाठी प्रसिद्ध होती. फार कमी लोक हे जाणत असावेत की आज कोल्हापूरात तांबडा, पांढरा रस्सा प्रसिद्ध आहे. तो पद्मा गेस्ट हाऊसनं पहिल्यांदा प्रचारात आणला. अबोल राहून ध्येय व कार्य अविचल करत रहाण्याचे व्रत दादांनी जीवनभर जोपासलं ते स्वकौशल्यावर. घरातील सारेजण आपल्या आचार-विचाराचे बनवण्याचा त्यांचा चमत्कार हा दूरदृष्टीचं प्रतीक म्हणायचा. मोठ्ठा मुलगा प्राध्यापक झाल्यावर त्याला स्वतः घर बांधून देऊन स्वतंत्र करणारे दादा खरे पुरोगामी वडील. प्रतिभानगर वाचनालयाच्या स्थापनते ते आघाडीवर होते. जे जे समाजहिताचं ते ते करण्यात पुढाकार घेणारे प्रा. डी. एम. चव्हाण हे पुरोगामी बहुजन समाजाचे आदर्शभूत, अनुकरणीय, आदरणीय शिक्षक होते.