पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढे इंग्रजी इ. ४ थी पर्यंतचे शिक्षण न्यू स्कूलमध्ये पूर्ण केल्यानंतर ते प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दाखल झाले. तेथून सन १९२७ मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. तेथून त्यांनी सन १९३३ मध्ये विज्ञान शाखांतर्गत बी. ए. (ऑनर्स)ची भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रातील पदवी संपादन केली. सन १९३४ मध्ये ते रसायनशास्त्र विषय घेऊन बी. एससी. झाले. विज्ञान शाखचे फेलो म्हणनू त्यांना राजाराम महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पुढे भौतिकशास्त्राचे डेमॉन्स्ट्रेटर म्हणून त्यांना नोकरी मिळाली. राजाराम महाविद्यालयात शिक्षणापासून निवृत्तीपर्यंतचा काळ (सन १९२७ ते १९६९) त्यांनी घालवला. या कालावधीत त्यांच्या हाताखालून शिकून मोठे झालेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, अधिकारी झाले आहेत. दादांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेला आदर मी अनेक प्रसंगी अनुभवला आहे. दादांनी समाजसेवेच्या आपल्या कार्याचा प्रारंभ राजाराम महाविद्यालय कर्मचारी सोसायटी, कोल्हापूर जिल्हा गव्हर्मेन्ट सटस् को-ऑप बँक इत्यादींच्या स्थापनेने केला. सन १९६३ साली राष्ट्रसेवा दल, समाजवादी संस्काराच्या मंडळींनी प्रख्यात साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली आतंरभारती शिक्षण मंडळाची स्थापना केली. दादांचा या संस्थेच्या स्थापनेत फार मोठा वाटा आहे. या संस्थेत दादा काही काळ कार्याध्यक्ष होते. सध्या ते या संस्थेच्या उपाध्यक्षपदांची धुरा सांभाळत आहे.

 आंतरभारती विद्यालयाबरोबरच संस्थेने गरीब व हरिजन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावयाचे ठरवले. दादांनी राजारामपुरीतील आपली जागा वसतिगृहासाठी देऊ केली. मुलांच्या जेवणाचा यक्षप्रश्न संस्थेपुढे होता. दादांनी पन्नास-साठ विद्यार्थ्यांचे जेवण स्वतःच्या शिवाजी पेठेतील घरात करायचे व ते राजारामपुरीत पोहोचवायचे. गरीब व हरिजन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी दादांनी उचललेले हे सतीचे वाण आज दुर्मीळच म्हणावे लागेल! दादांच्या समाजकार्यात त्यांना घरातील मंडळींचे योगदान कुणालाच विसरता येणार नाही. समाजासाठी सतत राबत राहायचे. मोबदल्यात पद, प्रतिष्ठेचा हव्यास त्यांनी कधी धरला नाही. मी अमुक केल्याचा दंभ, अहंकार दादांना कधी शिवला नाही. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!' या निष्काम कर्मयोगाची कास दादा सदैव धरत आलेत.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/१००