पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ऊसतोड मजुरांच्या हंगामी वस्त्या ज्यांनी पाहिल्यात, त्यांना त्यांच्या जगण्याची कल्पना करणं अशक्य नाही. पाचटापासून बनवलेली पालं. त्यातच चुली पेटतात. चुकून धग लागली तर संपूर्ण वस्ती बेचिराख होण्याची भीती. आपल्या पुढच्या उद्दिष्टांमध्ये या वस्त्यांमधल्या महिलांसाठी सामूहिक स्वयंपाकघर असायलाच हवं. दोन जिल्ह्यांच्या प्रशासनात सुसंवाद प्रस्थापित करता आला तर आणखीही बरंच करता येईल. मुलांना शिक्षण हमी कार्ड, आरोग्य हमी कार्ड आणि अन्नसुरक्षेची हमी प्राधान्यक्रमानं मिळवावी लागेल. ही माणसं मतदानापुरती मराठवाड्याची असतात आणि कामापुरती पश्चिम महाराष्ट्राची! मग यांचं जगणं सुसह्य करण्याची जबाबदारी कुणाची. तिकडचे आणि इकडचे एकत्र आणायलाच हवेत. ज्या जिल्ह्यात ही माणसं जातील तिथं त्यांना रेशन मिळायला हवं. रॉकेल तर हवंच हवं. त्यांच्या मुलाबाळांना कारखान्यांच्या ठिकाणीच जवळपास व्यवसाय शिक्षण उपलब्ध करून द्यायला हवं. हंगामात ही मुलं आईवडिलांना भेटू शकतील. सध्या सतत घराबाहेर असणाऱ्या आईवडिलांना लहान मुलं ओळखत नाहीत, अशी परिस्थिती आहे, ती तरी किमान संपुष्टात आणावी लागेल.

 मला राहून-राहून प्रश्न पडतो. ऊसदरासाठी पश्चिम महाराष्ट्रानं ऊग्र आंदोलनं पाहिली. ती करणाच्या संघटनांचे नेते राजकीय पक्ष चालवतात. मंत्रिमंडळापर्यंत पोहोचतात. पण या नेत्यांनासुद्धा उसाच्या फडात घाम गाळणारा हा ऊसतोड मजूर का दिसत नाही? कष्टकऱ्यांंचे नेते म्हणवणाऱ्यांंना या कष्टकऱ्यांंशी काही देणंघेणं नसावं? साखर कारखाने तर बहुतांश सहकार तत्त्वानुसार चालणारे. ही अशी वेठबिगारांसारखी माणसं राबवणं सहकाराच्या कुठल्या तत्त्वात बसतं ? श्रमांचे खासगीकरण, कंत्राटीकरण सहकाराच्या झेंड्याखाली करणं आक्षेपार्हच नव्हे तर नीतीमत्तेला सोडून आहे. लहान मुलं सर्रास वाढंं गोळा करताना, मोळ्या बांधताना सामान्यातला सामान्य माणूस पाहू शकतो. पण बालमजुरी रोखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते अधिकारी मूग गिळून कसे राहतात? त्यांना काम करू द्यायचं नाही, एवढीच खबरदारी घेऊन थांबता येणार नाही. ती मुलं शाळेत जाऊ शकतील, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी. मजूर स्त्रीपुरुषांमधल्या स्त्रिया तर निव्वळ वेठबिगारासारखं राबतायत. त्यांच्या कामाचा दाम नवरा ‘अॅडव्हान्स'मध्येच घेतो. दोन-तीन वर्षांचे श्रम आगाऊ विकून टाकतो आणि मोठा हुंडा देऊन मुलीचं लग्न कोवळ्या वयातच उरकतो. तो तरी दुसरं काय करू शकणार! आजमितीस त्याला कुणी वालीच नाही. स्थलांतर करावंच लागणार. मुलगी घरात सुरक्षित राहील याची काय हमी?

९२