पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/92

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेपाहिला आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ती लेक लाडकी अभियानच्या चळवळीत सहभागी झाली. व्यवसाय शिक्षणासाठी साताऱ्याला आलेल्या पहिल्या बॅचमध्येच ती होती. प्रशिक्षण घेऊन ती आता नर्स बनलीय. आपल्या या वाटचालीचा आपल्याला अभिमान असल्याचं तिनं बालहक्क संरक्षण आयोगासमोर अभिमानानं सांगितलं.

 अनेक मुलींच्या अशाच कहाण्या आहेत. हुंड्याची हाव किती महाभयानक असते, हे एका मुलीला अवघ्या पाचच महिन्यांत कळलं. लग्नात वडिलांनी हुंड्याची ऐंशी टक्के रक्कम दिली होती. भांडीकुंडी, टीव्ही... सगळं काही दिलं होतं. दहावीची परीक्षा नुकतीच दिलेली ही मुलगी जेव्हा बोहल्यावर चढली तेव्हा तिचा नवराही शिक्षण घेत होता. त्याचं घरात काही चालत नव्हतं. काही चुकलं तर अजूनही तो वडिलांचा मार खात असे. घरातले लोक हुंड्याची उर्वरित रक्कम वडिलांकडून घेऊन येण्यासाठी या मुलीवर दबाव आणू लागले. लग्नात दिलेला टीव्ही जुन्या पद्धतीचा होता. आता या मंडळींना एलईडी टीव्ही हवा होता. हिच्या वडिलांनी लग्नातच आपल्या नातेवाइकांकडून बरीच रक्कम उसनी आणली होती. आता पुन्हा एवढे पैसे कसे उभे करणार? अखेर त्या पित्यानं शरणागती पत्करली आणि लग्नानंतरच्या पाचव्या महिन्यातच तो मुलीला घरी घेऊन आला. अडीच वर्षं घरीच राहिल्यानंतर शिरूर-कासारमध्ये राहणाऱ्या तिच्या नातेवाईक महिलेनं तिला लेक लाडकी अभियानबद्दल सांगितलं आणि ती आम्हाला भेटायला आली. ती साताऱ्यात व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच तिकडे तिचा नवराही डिप्लोमा पूर्ण करून पुण्याला नोकरीला लागलाय. तिला नांदायला बोलावतोय. पण 'पुण्यात राहायला येईन आणि तिथंही नोकरी करेन,' ही तिची अट!

 बारावीत असताना लग्न झालेल्या एका मुलीच्या सासऱ्यानेच तिच्याशी गैरवर्तन केलं आणि तिनं वडिलांना बोलावून घेतलं. त्यांच्यासोबत ती माहेरीच राहू लागली. तिच्या पतीला दारूचं व्यसन होतं आणि लग्नानंतर काही दिवसांतच तो तिला घेऊन वेगळा राहू लागला होता. परंतु ती माहेरी गेल्यानंतर तिला न्यायला तो कधी आलाच नाही. दुसऱ्या एका मुलीनं बारावीत असताना ठरलेल्या लग्नाला नकार दिला आणि लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून फोटोशॉपचा कोर्स केला. तंत्रज्ञान कशाशी खातात हे कुणाला ठाऊकसुद्धा नाही, अशा गावात जन्मलेली ही मुलगी आज इतरांच्या लग्नाचे फोटो अल्बम संगणकावर डिझाइन करतेय. किशोरी गटाच्या माध्यमातून आमच्याशी संलग्न असलेल्या मुस्लिम समाजातल्या एका मुलीनं ब्यूटी

८८