प्रमाणावर स्थलांतरं होतायत. त्यामुळे लोकसभेचा एक आणि विधानसभेचे तीन मतदारसंघ कमी झालेत. आता मुलींची संख्या घटत चाललीय. एक हजार मुलांमागे साडेसहाशे मुली, एवढंच आजचं प्रमाण आहे. हे असंच राहिलं, तर पुढे लोकसंख्येचा समतोल कसा राहील? जिल्ह्यातले मतदारसंघ असेच कमी होत गेले तर तुमचं राजकीय भवितव्य काय?खरं तर तुम्ही आम्हाला बँक्स म्हणायला हवं. बघा पटतंय का?"
थेट राजकारणाशी जोडलेला हा मुद्दा युवा नेत्याला चटकन समजला; भिडला. शिवाय, “मी दारूचे धंदे उधळून आलेली बाई आहे. मला धमक्या देऊ नका," हेही सांगितल्यामुळे आणि पोलिस अधिकारीही आमच्यासाठीच तिथं आलेले असल्यामुळे त्याचा पारा उतरला होता. शेवटी कारवाईचे कामकाज पूर्ण करून आम्ही सगळे त्याच्याबरोबरच खाली आलो. “या ताईला काही करायचं नाही. जाऊद्या ताईला," असं त्यानं जमलेल्या तरुणांना सांगितलं. आमच्याच गाडीच्या बॉनेटवर उभा राहिला आणि भाषण वगैरेही केलं. मग पुढे-मागं पोलिसांच्या गाड्या देऊन स्थानिक प्रशासनानं आम्हाला बीड जिल्ह्याच्या सीमेपर्यंत बंदोबस्तात सोडलं. पण हे सीमोल्लंघन तात्पुरतं ठरणार, हे त्यावेळी आम्हाला कुठं माहीत होतं! एकात एक गुंतलेले या जिल्ह्यातले असंख्य प्रश्न पुढे आमच्या पावलांना याच जिल्ह्यात घेऊन येणार आणि इथले हजारो लोक पुढे आपल्याशी घट्ट जोडले जाणार, याची पुसटशीही शंका जिल्ह्याची सीमा ओलांडताना आम्हाला आली नव्हती. पण... त्या दिशेनं प्रवास सुरू झाला होता. गाडी धावत होती साता-याकडे; पण आमचं डेस्टिनेशन होतं बीड !