पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्योग दाखवले. दारूबंदीचे अनुभव सांगणाऱ्या महिलांच्या भेटीगाठी घडवल्या. सातारा तालुका पोलिस स्टेशनचं कामकाज दाखवलं. घराबाहेरचं जग बघून मुली त्या जगात आपली जागा शोधू लागल्या.

 या कालावधीत १२ बालविवाह थांबले होते. व्यावसायिक प्रशिक्षणात हॉस्पिटॅलिटीसाठी १०-१२ जणी तयार झाल्या; पण प्रत्यक्षात पाचच कोर्ससाठी औरंगाबादला गेल्या आणि त्यातल्या दोनच टिकल्या. मुलं मात्र टिकून राहिली. त्यातला एक आता लोणावळ्यातल्या मोठ्या हॉटेलात नोकरी करतोय. नर्सिंगसाठी सह्याद्री हॉस्पिटलशी संपर्क साधला. पण होस्टेल उपलब्ध होईना. फ्लॅटही मिळेना. हेल्थ असिस्टंट कोर्स बऱ्याच मुलींना हवा होता. पूर्वी हा कोर्स आम्ही सातारा जिल्ह्यातल्या ४५० मुलींना दिलाय; त्यामुळे त्याचा अनुभव होता. या कोर्ससाठी शिवाजी विद्यापीठात गेलो तर कुलगुरू औरंगाबादचेच. आमचं काम बघून त्यांनी लोकविकास केंद्राला पत्र लिहायला सांगितलं. बालविवाह रोखणाऱ्या मुलींना निःशुल्क प्रशिक्षण द्या, अशी विनंती आरोग्य संचालकांना केली. अर्थात हे सगळं प्रत्यक्षात होण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला. शेवटी मुलींना सातारला आणलं आणि प्रैक्टिकलसाठी सिव्हिल हॉस्पिटल उपलब्ध करून घेतलं. नर्सिगची बॅच सुरू झाली. मुक्तांगणमध्ये मुलींच्या राहण्याची व्यवस्था केली. १५०० रुपये विद्यावेतन मिळणार होतं. त्यामुळे मेसचा प्रश्न सुटला. मुलींना सोडायला रिक्षा ठेवली. पण त्यांच्यावर नजर ठेवायला वॉर्डन म्हणून कुणाची नेमणूक केली नाही. मुलींना वॉर्डन नव्हे, गार्डियन हवा होता. सोनी, स्वाती, मुक्ता, हिना, सुनीता... प्रत्येक मुलीची स्वतंत्र कहाणी. एक लग्न मोडून नवऱ्याला सोडून आलेली, दुसरी ठरलेलं लग्न रद्द करून आलेली, एक नवऱ्यानं सोडलेली आणि उरलेल्या संभाव्य बालविवाह टाळण्यासाठी आलेल्या. गावच्या शाळेत प्रवेश घेऊन व्यवसाय शिक्षणासाठी इथं आलेल्या या मुलींच्या नावानं गावी कोणीही शाळेची परीक्षा देऊ शकतं, ही नवी महिती समजली.

 या मुलींमधली सोनी सोळाव्या वर्षी लग्न होऊन सासरी गेली आणि तीन वर्षात आयुष्यभराचा अनुभव घेऊन निघून आली. पूजा, सुनीता चौदाव्या वर्षीच लग्न झालेल्या. त्यांना आता कोर्स पूर्ण करून नोकऱ्या मिळू लागल्या. ऊसतोडीनिमित्त मोकळ्या आभाळाखाली राहण्याची सवय असलेल्या या मुली बोल्ड आणि धाडसी. पण त्यामुळंच शिस्तीचा थोडा अभाव. परिणामाची फिकीर करण्याची वृत्ती कमी. खरं तर सातारा जिल्ह्यातच ११ साखर कारखाने आहेत.

७९