पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 बडेवाडीत कैलास मुलींना पथनाट्य शिकवत होता, म्हणून मुलांची पहिली बैठक तिथंच घेतली. किती मुलं कामधंदा करतात, कितीजण कॉलेजला जातात, अशा प्रश्नांच्या उत्तरांतून मुलांवर त्या भागात ब-यापैकी गुंतवणूक केली जाते, हे लक्षात आलं. शिक्षणाचा स्तर वाईट असला तरी मुलांची त्याविषयी नाराजी नाही. लहानपणापासून ऊसतोडीला जाण्यामुळे शिक्षणाबद्दल फारसं आकर्षणही नाही. तुमच्या भागात बालविवाह का होतात, असा प्रश्न या मुलांना विचारला, तेव्हा मिळालेल्या उत्तरामुळं वास्तव आणखी गडद झालं. मुलींची संख्या कमी झाली आहे, मुलगी मिळणार नाही, अशी भीती मुलांना वाटते. शिवाय या मुलांनाही पुढे ऊसतोडीलाच जायचे आहे. स्थलांतरामुळं आठ महिने भागात सामसूम असते आणि त्यामुळे कुठलाही व्यवसाय तिथं चालत नाही. शेताला पाणी नसल्यामुळे जमीन पिकत नाही. लग्न झालं तर कोयता वाढतो, हा सरळसोट हिशोब.


 बडेवाडीनंतर मांगेवाडीत बैठक झाली. कैलास बोलला. मी बोलले. आपल्या भागात कसा विकास व्हायला पाहिजे, यावर चर्चा केली. हळूहळू अशा बैठकांमध्ये मुलं सकारात्मक बोलू लागली. मुलींना शिकायला मिळालं पाहिजे, लहान वयात लग्न होता कामा नये, असं म्हणू लागली. गावनिहाय बैठका झाल्यानंतर शैलाताईंनी मानूर, रायमोहा, खालापुरी, शिरूर आणि राक्षस भुवन या गावांमध्ये विभागवार बैठका घेतल्या. बालविवाह करणं चांगलं नाही, हे मुलांना पटत होतं. पण नंतर चांगल्या मुली मिळत नाहीत, हेच कारण सांगितलं जात होतं. चांगली मुलगी म्हणजे व्हर्जिन मुलगी, हे नंतर समजलं. महिलाविषयक गुन्ह्यांचे प्रमाण भागात जास्त असूनही पोलिसांत नोंदी नाहीत. अनेक गोष्टी बोलल्या जात नाहीत. पण लवकर लग्न करण्यामागची कारणं हळूहळू लक्षात येत होती. भागात हुंड्याचंही प्रमाण जास्त आहे. शिक्षकाला सर्वाधिक हुंडा मिळतो, कारण तो सावलीत काम करतो. त्याला उन्हात जावं लागत नाही. बायकोला घेऊन तो ऊसतोडीला जाणार नाही, पोरगी घरात आनंदात राहील, ही त्यामागची भावना. भागात डीएड कॉलेज जास्त. त्यामुळे शिक्षक नवरदेवही जास्त. पद ग्रँटेबल व्हावं, संस्थेनं नोकरीत कायम करावं, यासाठी सासव्यानं हुंडा म्हणून संस्थेला देणगी द्यायची, अशीही पद्धत असल्याचं समजलं. लष्करात, पोलिसात, मुंबईत नोकरीला असलेल्या नवरदेवांनाही भलतीच मागणी. निश्चित उत्पन्न आणि मुलीला ऊसतोडीला जावं न लागणं, हीच त्यामागची मुख्य कारणं. पोरी कमी पडू लागल्यावर काही विशिष्ट समाजात मुलीच्याच बापांनी हुंडा मागायला सुरुवात केल्याचंही आम्ही ऐकून होतो.

७७