पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समस्यांवर मुलांनी पथनाट्य बसवलं. कौटुंबिक हिंसा रोखण्याचा निर्धार व्यक्त करतानाच 'बदल घडवण्यासाठी धाडस दाखवा,' हे घोषवाक्य घेऊन ऑरेंज डे साजरा केला. आमच्याशीही या विषयावर बोललं पाहिजे, असं मुलं स्वतःहून म्हणू लागली. फक्त मुलांच्या पाच बैठका या भागात आम्ही घेतल्या. जागतिक महिला दिनाचा एक कार्यक्रम आम्ही १९ मार्चला मुलांसमवेत साजरा केला. त्यानिमित्त झालेल्या मेळाव्याला 'बालविवाहाविरुद्ध तरुणांचा एल्गार' असं नाव दिलं होतं. महिला दिनानिमित्त मुलींना कृतिशील शुभेच्छा देताना 'आम्ही बालविवाह करणार नाही, मुलींना समानतेनं वागवू, हुंडा घेणार नाही, हिंसा करणार नाही,' अशी प्रतिज्ञा मुलांनी केली. सगळ्याच गोष्टींसाठी पुरुषांना दोष देणारी मंडळी, अशी आमची प्रतिमा विभागात तयार होत होती, ती या निमित्तानं पुसली गेली. मुला-मुलींनी कॉलेजांमधून एकत्रितपणे पथनाट्य सादर केली. कॉलेजांनीच आयोजन केल्यामुळे हे शक्य झालं; अन्यथा मुला-मुलींच्या एकत्रित बैठका आम्हीही अजून घेऊ शकलेलो नाही.


 प्रकल्प सुरू केला तेव्हाच या कामात मुलांचाही सहभाग असावा, असं ठरवलं होतं. दीड वर्षाच्या बजेटमध्ये दर सहा महिन्यांनी मुलांसाठी कार्यक्रम करणं प्रस्तावित होतं. ११ ते २१ वयोगटातील लग्न न झालेली मुलं आमच्या दृष्टीने महत्त्वाची होती. कारण त्यांची लग्नं कधीही होऊ शकतात. त्यांनी बालविवाहाला नकार द्यायला हवा, ही आमची भूमिका होती. त्यासाठी चुणचुणीत, निर्व्यसनी मुलांचे गट तयार करायला आशांना सांगितलं होतं. मुलांची आणि मुलींची एकत्र मीटिंग आम्ही न घेण्याचं कारण तिथल्या परिस्थितीत होतं. त्या भागाला जे रुचत नाही, पचत नाही, ते मुद्दाम करण्याची माझी इच्छा नव्हती. आणखीही एक कारण होतं. इतरत्र अनेक ठिकाणी मी लैंगिकतेची शास्त्रीय माहिती मुलामुलींना एकत्रितपणे सांगितली आहे. परंतु अशी शास्त्रीय माहिती मिळण्यापूर्वीच या भागातल्या मुलांना किशोरवयात बऱ्याच गोष्टी विकृत पद्धतीनं कळलेल्या असतात. भागात मनोरंजनाच्या सुविधा नाहीत. मोबाइल, सोशल मीडिया मात्र खुलेपणानं उपलब्ध. या मुलांना समजुतीच्या चार गोष्टी सांगायला कुणी नाहीत. आईवडील ऊसतोडीला गेल्यामुळे कसलाही दबाव नाही. मोबाइलमुळे कनेक्टिव्हिटी लाभलेली. अशा मुलांच्या मानसिकतेचं भान ठेवून काम करणं गरजेचं होतं. इतर ठिकाणच्या आणि इथल्या संस्कृतीत असलेली तफावत विचारात घेणं गरजेचं होतं.

७६