पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बनियन-हाफ पँटवरच! प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दरम्यानच्या काळात त्यांनी कुठून, कसं आणि कुठे पाठवलं, हे कळलंसुद्धा नाही. डॉक्टर पळून गेल्याचं कळल्यावर ‘आता काय करणार', असा प्रश्न पत्रकार आम्हाला विचारू लागले.
 
 सोनोग्राफी मशीन सील करण्यासाठी बेडशीट, लाख, मेणबत्ती, काडेपेटी असं साहित्य अशा वेळी आमच्यासोबत असतंच. सिव्हिल सर्जन डॉ. पवार यांनी मशीन सील करायला सांगितलं आणि डॉक्टर बेपत्ता झालेत असं पत्रकारांना सांगितलं. दवाखान्यातल्या फायली, रेकॉर्ड सगळं जप्त केलं आणि आम्ही सगळे पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल सर्जनच्या कक्षात आलो. दरम्यान, ही बातमी वा-यासारखी शहरात पसरली आणि शहरातले सगळे दवाखाने धडाधड बंद झाले. शहरात तब्बल ऐंशी सोनोग्राफी सेंटर होती, ती सगळी बंद झाल्याचं कळलं.इकडे मीडियाला कारवाईची माहिती मिळालेली. त्यामुळे पुढची स्टिंग ऑपरेशन करणं अशक्य झालं होतं.
 
 सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर अचानक अडीचशे ते तीनशे तरुण जमा झाले. आमच्या ट्रॅक्सला त्यांनी दुचाक्या आडव्या लावल्या होत्या. एका स्थानिक देवस्थानशी संबंधित ती 'सेना' होती आणि स्थानिक युवा नेता या जमावाचं नेतृत्व करत होता. कारवाई झालेले डॉ. सानप हेही या देवस्थानशी संबंधित असल्याचं समजलं. काही वेळानं तो युवा नेता सिव्हिल सर्जनच्या कक्षात आला आणि आम्हाला अद्वा-तद्वा बोलू लागला. बाहेरच्या मंडळींनी बीडमध्ये येऊन असं काही करणं त्याला रुचलेलं नव्हतं. नेमक्या त्याच वेळी लालूप्रसाद यादवांना अटक झाल्यामुळे बिहारमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती आणि शरद पवार पाटण्याला गेले होते. त्यावेळी विमल मुंदडा या आरोग्यमंत्री होत्या. त्या स्थानिक युवा नेत्याच्या प्रतिस्पर्धी पक्षातल्या. त्यामुळे मुंदडा यांच्याकडून ‘सुपारी घेऊन' आम्ही हे सगळं करीत आहोत आणि बीड शहराची त्यामुळे बदनामी होत आहे, असा सूर युवा नेत्यानं लावला होता.
 

 दरम्यान, तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना मी फोनवरून घटनेची माहिती दिली होती. आबांनी सूत्रं हलवली आणि पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक असे वरिष्ठ अधिकारी तिथे दाखल झाले. युवा नेत्याला आमच्या ताकदीचा अंदाज आला. तरीही आपण काहीही गैर करत नाही आहोत, हे त्याला समजावणं आवश्यक वाटलं. मी म्हटलं, “नेते, या जिल्ह्यातून मोठ्या