पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
बारा

 


 शिरूर कासार भागात समस्यांना तोटा नाही. पाऊल टाकेल तिथं समस्या आहेच, हे लक्षात येत होतं. तालुक्यातली आठ ते दहा लाख माणसं जर आठ महिन्यांहून अधिक काळ ऊसतोडीसाठी घरापासून दूर राहत असतील, तर मग त्यांच्या वाट्याच्या रेशनचं काय होतं? या कालावधीत ते जातील तिथं त्यांना रेशन मिळेल, इतकी लवचिकता आपल्या यंत्रणेत आहे का? एकाच राज्याचे दोन विभाग ‘आपल्याच' लोकांची जबाबदारी स्वीकारतात का? आंतरराज्य स्थलांतर करणाऱ्यांंसाठी धोरणं ठरवली जातात, तर राज्यांतर्गत स्थलांतर करणाऱ्यांंसाठी का नाही? स्थलांतरित लोकसंख्येच्या हितासाठी चर्चा, निर्णय व्हायला नकोत का? मराठवाड्याला मागे ठेवून महाराष्ट्रपुढे कसा जाऊ शकेल? एकूणच यंत्रणेमधल्या लवचिकतेच्या अभावाचा मुद्दा वारंवार समोर येत राहिला. या अलवचिकतेमुळं, असुविधांमुळे मग मुलगी नकोशी होते. तिला सांभाळायचं कसं, ही चिंता असते. मुलगा झाला तर 'कोयता' वाढतो, हा शुद्ध व्यवहार! या साऱ्यातून स्त्री घरादारात सर्वत्र आणि सर्व प्रकारच्या हिंसेची शिकार ठरते. या हिंसेच्या विरोधात मुलांनीही मुलींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं, असं वाटलं आणि आम्ही कॉलेजांमधून जाऊ लागलो. मुलांशी संपर्क साधला. मुलांमध्येही गांभीर्य येऊ लागलं. विशेष म्हणजे, मुलींच्या

७५