पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


 त्यांच्यासाठी साड्याही घेतल्या होत्या. पण गुन्हे नोंदवले गेले नसले, तरी लग्नं पोलिसी हस्तक्षेपाच्या धास्तीनंच रोखावी लागली होती. त्यामुळे सत्कार घ्यायला कसं यावं, अशी आयांची अडचण झालेली. तालुक्यातलं बदललेलं वातावरण मेळाव्यात लोकांशी बोलताना कळून येत होतं. मांडववाले, किराणावाले, लग्नात भांडी भाड्यानं देणारे असे व्यावसायिक लग्नाची ऑर्डर स्वीकारताना आता मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला मागू लागले होते. कारण बालविवाह असेल आणि तो रद्द झाला, तर या व्यावसायिकांना सगळं साहित्य घेऊन मांडवातून परतावं लागत होतं. मेळावा असा दणक्यात झाला, की शिरूर कासार तालुक्यात अजूनही लोक आठवण काढतात. बऱ्याच वर्षांपूर्वी एका स्थानिक आमदारांच्या प्रचाराला क्रांतिसिंह नाना पाटील आले होते, तेव्हा शिरूर कासारमध्ये प्रचंड मोठी सभा झाली होती. त्यानंतर एवढी गर्दी या गावानं प्रथमच बघितली होती आणि क्रांतिसिंहांच्याच भूमीतले आम्ही कार्यकर्ते या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार ठरलो. ही गर्दीही केवळ मुलींची होती. ज्या कधीही घराबाहेर पडल्या नाहीत, अशा मुलींची एवढी तुडुंब गर्दी! मुलींच्या बिनधास्त बोलण्यातून सतत जाणवत होतं की, यांना खूप काही हवंय. खूप भूक आहे. त्या दोन्ही हातांनी घ्यायला तयार आहेत. मुलींनी बेधडकपणे आपल्या समस्या मांडल्या. शाळेत प्रवेश मिळतो; पण शाळेत जाण्याचा आनंद मिळत नाही, ही बहुसंख्य मुलींची तक्रार. कारण अॅडमिशन घेतल्यानंतर थेट परीक्षेलाच शाळेला तोंड दाखवायचं, हा शिरस्ता. मग निकाल चांगला लागावा म्हणून कॉपी करायला मोकळे रान. रोजच्या रोज शाळेत जाणं मात्र अवघड. कारण शाळेपासून गावाचं अंतर किमान पाच किलोमीटर. सुनसान रस्ता. तरण्याताठ्या मुलांचा या रस्त्यावर असलेला वावर, हा सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर मुद्दा. मुलींची पळवापळवी, विनयभंग, अतिप्रसंगांचं प्रमाण जास्त. पण या प्रसंगापेक्षा पालकांना घराची अब्रू अधिक प्रिय असल्यामुळे तक्रारींचं प्रमाण अत्यल्प. दुसरीकडे, शाळेच्या इमारती मोडकळीला आलेल्या. मुलींसाठी स्वच्छतागृहांचीही सोय नाही. 'कशा जाणार आम्ही शाळेत?' असा रोखठोक सवाल मुलींनी मेळाव्यात केला. पालकांबरोबर ऊसतोडीला जाणाऱ्या अनेक मुली बोलायला पुढे आल्या. शाळा सोडून ऊसतोडीला जावं लागतं; कारण होस्टेलची सुविधा नाही. शिकायची आवड आणि इच्छा असलेल्या सुमारे दीडशे मुलींनी या मेळाव्यात होस्टेलची मागणी केली.

 किशोरी मुलींचा जाहीरनामा या मेळाव्यात मांडण्यात आला. मुलींच्या जन्माचे स्वागत प्रत्येक कुटुंबात आणि ग्रामपंचायतीत झालं पाहिजे, किशोरावस्थेत होणा-या शारीरिक आणि

६७