पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साताऱ्यातले सगळे कार्यकर्ते या मेळाव्याला हजर होते. पाण्याची टंचाई शिरूर कासारच्या पाचवीला पुजलेली. पाण्याचे कॅन विकत घेणं ही अत्यावश्यक बाब. आम्ही दीडशे कॅन मागवले होते. दुपारी बाराची वेळ मेळाव्यासाठी निश्चित केली होती. परंतु सकाळचे दहा वाजले, तरी एकाही गावातून एकही गाडी येईना, तेव्हा मेळाव्याबद्दल धास्ती वाटू लागली.

 सकाळी साडेदहा वाजता जेव्हा पहिली गाडी आली, तेव्हा मुली उतरून धावत-धावत आमच्याकडे आल्या. सगळ्यांनी चक्क दिवाळीतले कपडे घातले होते. केस मोकळे सोडले होते. गावात, घरात मुलींना केस मोकळे सोडायला बंदी असते. मोकळे केस सोडणाऱ्या मुलीच्या आईला दूषणं दिली जातात. तरीही केस मोकळे का सोडले, असं विचारलं तेव्हा मुली म्हणाल्या, "हे आमचं स्वातंत्र्य आहे. लेक लाडकी अभियाननं आम्हाला स्वातंत्र्य दिलं." हळूहळू गर्दी वाढत गेली. सगळ्याच नटून-थटून येत होत्या. गर्दी वाढली तशी नोंदणीसाठी केलेली यंत्रणा सगळ्यात आधी कोलमडली. मग मांडव अपुरा पडू लागला. स्टेजभोवती गराडा घालून काही मुली बसल्या. खाद्यसामग्री अपुरी पडणार म्हणून साहित्य वाढवलं. आचारी बोलावले. मांडवाबाहेर रस्त्यापर्यंत मुली बसल्या. रस्त्यापलीकडेही काहीजणींना थांबावं लागलं. स्थानिक मीडियावाल्यांना तेवढे कारण पुरलं. मुलींची कशी आबाळ झाली, उन्हात कसं उभं राहावं लागलं, या बाबी दुसऱ्या दिवशीच्या दैनिकात ठळकपणे छापून आल्या. पण २५०० मुली येतील असा अंदाज असताना ४५०० मुली तिथं कशा आल्या, यामागच्या कारणांचा शोध घ्यायला मीडियाला कुठे फुरसत होती? मांडवात जे घडलं, ते ऐतिहासिक होतं. किशोरवयीन मुलींच्या दबून राहिलेल्या आकांक्षांचा स्फोटच होता तो. आम्ही जी पथनाट्य सादर करत होतो, ती पाहून काय वाटलं, याबद्दल मुलींना पानभर लिहून आणायला सांगितलं होतं. त्यात मुली भरभरून व्यक्त झाल्या. एका मुलीनं तर लिहिलं होतं, "लहान वयात लग्न झाल्यानंतर मला सक्तीनं साडी नेसावी लागत होती. पण आता मी साडीमधून ड्रेसवर आले आहे." लेक लाडकी अभियानच्या कार्यकर्त्यांंनी गाणी म्हटली; पथनाट्य सादर झाली. 'दप्तर' लघुपटाचं औपचारिक लाँचिंग झालं. जिल्हाधिकाऱ्यांंनी मांडवातून माइक फिरवायला सांगितलं. मुलींनी बेधडक आपल्या समस्या मांडल्या. बारा बालविवाह रोखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांंना आनंद झाला. आम्ही सरकारी यंत्रणेला सोबत घेऊन काम करतो आहोत, हे त्यांना सकारात्मक वाटलं. ज्यांची लग्नं रोखली होती, त्यांच्या आयांचा सत्कार करायचं आम्ही ठरवलं होतं.

६६