पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.प्रचंड दबावाखाली आहेत, असं सारिका सांगत होती. या शाळेत एकही महिला शिक्षक नाही. रात्री मुक्कामालाही पुरुष शिक्षकच असतो. त्यातल्या एका शिक्षकामुळे मुलींवर भलतीच परिस्थिती ओढवलीय. रात्री बाथरूमला जायला मुली घाबरतात. कारण अभ्यासाच्या निमित्तानं हा शिक्षक मुलांना एका खोलीत बंद करतो. बाहेरून कडी लावतो. बाथरूमला जाण्यासाठी उठलेल्या मुलींना पकडतो. त्यामुळे भीतीनं मुलींनी बाथरूमला जाणं बंद केलंय. काही मुली चक्क अंथरूण खराब करू लागल्यात.... इत्यादी!

 ब्लॉक नर्सिंग अधिकारी (बीएनओ) हे ऐकून सुन्न झाला. त्यानं तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कानावर ही माहिती घातली. मुलींना मदत केली पाहिजे, हे दोघांनाही समजत होतं; पण आश्रमशाळा म्हटलं की अधिकारी जागच्या जागी थिजतात, अशी परिस्थिती. बहुतांश आश्रमशाळा म्हणजे राजकीय व्यक्तींनी त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तींना दिलेली कुरणंच. मुलांसाठी येणाऱ्या अन्नधान्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये कमाई करण्याची संधी. सिंदफणा आश्रमशाळाही अशाच व्यक्तीकडून चालवल्या जाणाऱ्या एका ट्रस्टची. अडचण मोठी होती, हे ओळखून तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणाले, "वर्षाताई आल्यावर बोलू." बीएनओनं होकार भरला.

 एका बैठकीनिमित्त मी जेव्हा शिरूरला गेले, तेव्हा त्याही बैठकीत सारिका शांत बसून होती. मधल्या काळात तिला माझ्याशी काहीतरी गंभीर बोलायचंय, याची कल्पना ब्लॉक नर्सिंग अधिकाऱ्यानं मला दिली होती; पण नेमका विषय सांगितला नव्हता. बैठक झाल्यावर सारिका एकटीच मागं थांबली. तिच्या गावातल्या एका मुलीचा बालविवाह झाला होता. त्या मुलीनं सारिकाला एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र तिनं मला वाचायला दिलं. बालविवाह झालेली मुलगी सिंदफणा किशोरी मेळाव्याला हजर होती; पण आपलं लग्न थांबवू शकली नव्हती. ती त्याच आश्रमशाळेत शिकायला होती. तिथली परिस्थिती तिनं पत्रात सविस्तर मांडलेली. आईवडील ऊसतोडीला जाताना एक तर त्यांच्याबरोबर मुलीला घेऊन जायचे किंवा आश्रमशाळेत ठेवायचे. आश्रमशाळेत ती सुरक्षित नाही म्हटल्यावर लग्न उरकून टाकलं. आश्रमशाळेत रात्री एकदा मावशी भाकऱ्या करून निघून गेल्या की त्यानंतर जे घडतं ते तिनं लिहिलं होतं. रात्री मुक्कामाला पुरुष शिक्षक असतात आणि त्यातला एकजण मुलींशी कसंही वागतो, प्रसंगी कपडे काढायला लावतो, वगैरे वर्णन वाचून मी हादरलेच! एकतर ऊसतोड

५९