पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


वडिलांचा निर्धार वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचला. मुलीचे आजोबाही आमच्यासोबत गावागावांत फिरले. आपल्या घरातला अनुभव ते सांगायचे आणि या निर्णयाचं अनुकरण करावं असं आवाहन लोकांना करायचे. हे घर स्थानिक कुटुंबांसाठी 'रोल मॉडेल' ठरलं. एखादा लघुपट इतका सखोल परिणाम करू शकतो, हे पाहून आम्हाला खूपच समाधान वाटलं.

 लघुपटातली आजी मुलांना इतकी का भावतेय, याचा शोध घेतला असता खूपच वेगळी माहिती मिळाली. अगदी अंतःकरणाला भिडणारी. ऊसतोडीसाठी या मुलांचे आईबाप वर्षातून सहा-आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ घराबाहेर असतात, तेव्हा आजीच त्यांची आई होते. आमच्याशी कायमची जोडली गेलेली एक किशोरवयीन मुलगी आहे. तिच्या घरातला किस्सा ऐकून आम्ही सर्द झालो होतो. तिचा लहान भाऊ आजीलाच आई म्हणायचा. कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर जेव्हा आईवडील घरी यायचे, तेव्हा तो घरात जेवायलाच तयार व्हायचा नाही. "ही बाई कोण आलीय आपल्या घरात? ती का स्वयंपाक करतेय? तिला सांगा, तू जा इथून. आजीनंच स्वयंपाक करायचा," असं आपल्या आईबद्दल बोलून तो घराबाहेर निघून जायचा. आपलंच पोरगं आपल्याला ओळखत नाही, हे बघून बिचाऱ्या आईबापाच्या डोळ्यात पाणी यायचं. पण पोरगं हट्टाला पेटलेलं असायचं. बराच मोठा होईपर्यंत तो असंच वागत राहिला. त्याच्यापेक्षा थोरल्या बहिणीला आईवडील ऊसतोडीला जाताना सोबत न्यायचे. तिची तर वेगळीच तऱ्हा! घरी आल्यावर ती घराच्या भिंतीकडे घाबरून बघायची. तिला वाटायचं ही भिंत आपल्या अंगावर पडणार. आईवडिलांना ती म्हणायची, "आपण इथं नको राहायला... खोपीतच राहूया. इथं भीती वाटतेय."

 आम्ही काम करण्यासाठी कोणता परिसर निवडलाय आणि तिथं किती डोंगराएवढी आव्हानं आहेत, याचं भान आम्हाला देणारी ही प्रातिनिधिक कहाणी. हंगामी स्वरूपात स्थलांतर करणाऱ्यांच्या पोराबाळांची मानसिक ओढाताण सांगणारी. त्यांची मुळं कुठेच नीट रुजत नाहीत. मातीच्या घरापेक्षा एखाद्या लहानगीला माळावरची खोपी अधिक सुरक्षित वाटू लागत असेल तर कळतीसवरती होईपर्यंतचा तिचा प्रवास कसा होत असेल? कशी होत असेल जडणघडण या पोरींची? ऊसतोडीला जाताना शाळेसाठी पोरींना घरात ठेवणाऱ्या आईबापाच्या जिवाला घोर. पोरीकडे रोखून बघणाऱ्या नजरांना जरब बसवण्यासाठी बाप जवळ नाही. सावलीसारखी सोबत करायला आई जवळ नाही. काही अघटित घडलंच तर

५१