पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 दोन गाड्यांमधून आम्ही सगळे बीडला गेलो. गटातल्या अनेक मुली जिल्ह्याचे ठिकाण प्रथमच बघत होत्या. परदेशी आल्यासारख्या विस्मयचकित झाल्या होत्या त्या. लहान आणि मोठ्या गटाची पथनाट्यं वेगवेगळ्या चौकांमध्ये सादर झाली. वृत्तवाहिन्यांच्या स्थानिक प्रतिनिधींनी चित्रीकरण केलं. पथनाट्यानंतर बालविवाहाच्या विषयावर बोलायला एका वाहिनीनं एका लहान मुलीला पुढे यायला सांगितलं. त्यावेळी नऊ वर्षांची सारिका जे काही बोलली, ते ऐकून पत्रकारच रडू लागला. प्रयोगसुद्धा अगदी सुविहित. मुलींना अभिनय करावाच लागत नव्हता. पाठांतरही करावं लागलं नव्हतं. स्वतःचं जगणंच मांडत होत्या त्या. पुढे सावित्रीबाई फुले जयंतीदिनी (स्त्रीमुक्तीदिन : तीन जानेवारी) एका वाहिनीनं बालवविवाहाच्या समस्येवर ३५ मिनिटांचा कार्यक्रम सादर केला. 'लहान मुलीला नवरी समजू नका' हे मुलींचं पथनाट्य संपूर्ण दाखवलं. बीडमध्ये चौकाचौकात प्रयोग केल्यानंतर मुलींना ‘कामधेनू' हॉटेलमध्ये जेवायला नेलं. तिथं रोज पुरणपोळी मिळते. हॉटेलात जेवण्याचा अनेक मुलींचा हा पहिलाच प्रसंग. जेवल्यानंतर जिन्यातून मुली खाली आल्या, तर समोर त्यांना आइस्क्रीम पार्लर दिसलं. आइस्क्रीमच्या मोठ्या पोस्टरनी संपूर्ण भिंत रंगलेली. मुली त्या भिंतीकडेच एकटक बघू लागल्या. काही मुली कैलासला म्हणाल्या, "दादा, भिंतीवरचं ते पोस्टरच काढून खावं वाटतंय." मग ज्ञानेश नावाच्या आमच्या बीडच्या कार्यकर्त्यानं सगळ्या मुलींना आइस्क्रीम दिलं.

 इकडे ‘दप्तर' या लघुपटाचं प्रदर्शन गावोगावी सुरूच होतं. बालविवाह झाल्यानंतरही खमक्या आजीच्या पुढाकारानं मुलीचा बाप तिला परत घरी आणून शाळेत पाठवतो आणि दप्तर आणून देतो, या सत्यकथेचा लोकांच्या मनावर नकळत परिणाम होऊ लागला होता. काही ठिकाणी तर तो खूपच खोलवर झाला. बडेवाडीच्या एका आजोबांनी ठरवलेलं नातीचं लग्न तिच्या वडिलांनी रोखलं. मुलगी आठवीत शिकत होती. आम्ही सगळे तिच्या वडिलांना भेटायला गेलो तेव्हा ते म्हणाले, "सिनेमात बापानं मुलीला दप्तर दिलं हे पाहून मी भारावलो." आजोबांशी बोललो तेव्हा त्यांचंही मतपरिवर्तन झाल्याचं लक्षात आलं. मग मुलीच्या वडिलांचा एक फोटो काढून घेतला आणि त्यांच्या परवानगीनं शिरूर कासारमध्ये फोटोसह पोस्टर लावलं. 'मी बदलतोय. तुम्ही का नाही?' अशी त्या पोस्टरची कॅचलाइन होती. माध्यमांनी या घटनेची आपुलकीनं दखल घेतली. एका वाहिनीनं तर पूर्ण स्टोरी केली आणि या

५०