पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाचून आपण योग्य दिशेनं चाललो आहोत, हे पटू लागलं. कलेच्या माध्यमाची ताकदही पटली.

 आम्ही तर सगळे कलाकार झालो. आता ज्यांच्यासाठी काम करायचं, त्याच मुलींना पथनाट्याच्या माध्यमातून लोकांपुढे आणायचं ठरवलं. त्यांचं एक अभिनय प्रशिक्षण शिबिरच घेतलं. मांगेवाडी या आम्हीच दत्तक घेतलेल्या गावात आधी गेलो. मुलींना गोळा केलं; पण कसं होईल, काय होईल, याचा अंदाज येईना. या मुलींना जमणार का अभिनय? काही शाळेत जाणाऱ्या, काही शिक्षण सोडलेल्या, काही कधीच शाळेत न गेलेल्या, लिहिता-वाचता न येणाऱ्या मुलीही गटात होत्या. सरळ साताऱ्याहूनच कलाकार आणून करावीत का पथनाट्यं? असा विचार आला; पण या मुलींनी आपले प्रश्न स्वतःच लोकांसमोर मांडावेत, हा आग्रह अधिक प्रभावी ठरला. मुलींनीच मिळून नाटक लिहिलं. 'लहान मुलीला नवरी समजू नका' असं नाव दिलं. मानूर गावात पहिला प्रयोग. परंतु पथनाट्य म्हणजे रस्त्यावर करायचं नाटक, हेच तिथं पोहोचेपर्यंत अनेक मुलींना माहीत नव्हतं. रस्त्यात मुलं उभी होती. ओळखीची माणसं दिसत होती. मांगेवाडीतल्या किशोरवयीन मुली भलत्याच घाबरल्या; संकोचल्या. पण बडेवाडीच्या मुली वयानं लहान होत्या. त्यांनी छान नाटक सादर केलं. गावातल्या वयोवृद्धांनी मुलींना रोख बक्षिसं द्यायला सुरुवात केली, तसे मुलींचे चेहरे खुलले.

 खुद्द शिरूर कासार या तालुक्याच्या गावी मात्र "दादा, आम्ही रस्त्यावर, चौकात प्रयोग करणार नाही," असं मुली कैलासला म्हणू लागल्या. तिथं सगळेच ओळखीचे लोक. शिवाय तालुक्याचे ठिकाण. लोक काय म्हणतील, याची धास्ती. मग गावातून फिरवतफिरवत मुलींना आम्ही मुख्य रस्त्यावर आणलं. आधी छोट्या मुलींना नाटक करायला सांगितलं. त्यांचं लोकांनी कौतुक केलेलं बघून मोठ्या मुलीही तयार झाल्या आणि त्यांनी खूपच देखणा प्रयोग केला. त्या एकाच दिवसात शिरूर कासार शहरात मुलींनी पाच प्रयोग केले. मग या मुलींनी शाळांमधून आणि इतर ठिकाणी पथनाट्याचे खूप प्रयोग केले. या नाटकांचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्या-ज्या शाळा-कॉलेजांत पथनाट्य सादर होत होतं, तिथली मुलं-मुली तेच नाटक स्वतः करायला घेत असत. मुलींचा आत्मविश्वास वाढत होता. मग त्यांना थेट बीडलाच घेऊन जायचं ठरवलं. चौकाचौकात पथनाट्यं करायची असं ठरलं.

४९