पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/52

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


डिस्कळच्या महिला कार्यकर्त्यांनी आमच्या युनिटला भोजन पुरवण्यापासून स्वतः अभिनय करेपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या. हे सगळं करण्यामागे आणखीही एक उद्देश होता. आजवर आम्ही कायद्याचे पालन होण्यासाठी आग्रहानं लढणारे आक्रमक कार्यकर्ते म्हणून परिचित होतो. लोकांच्यात मिळून-मिसळून काम करायचं, त्यांची मानसिकता बदलायची, आपलं म्हणणं पटवून द्यायचं तर आक्रमकतेचा उपयोग नव्हता. बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे; पण आक्रमकपणे केवळ त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी आम्हाला त्याची कारणं शोधायची होती. ती नष्ट करायची होती. कायद्यावर न बोलताही कायद्याच्या रक्षकाची प्रतिमा कायम ठेवायची होती आणि त्यासाठी या माध्यमाचा वापर करायचा होता. म्हणूनच 'दप्तर' नावाच्या या लघुपटात मी आजीची भूमिका केली. ही आजी बालविवाहाच्या प्रकरणात शेवटी नातीच्या हितरक्षणासाठी हातात दंडुका घेऊन उभी राहते. तीस मिनिटांच्या या लघुपटानं शिरूर-कासार तालुक्यात नेमकं काय काम केलं, हे आज लख्ख दिसतंय. तालुक्यातल्या असंख्य मुलामुलींना हा लघुपट आज तोंडपाठ आहे. तीनचाकी अॅपे रिक्षातून ५५ इंचांचा मोठा टीव्ही गावोगावी नेऊन हा लघुपट दाखवला गेला. रस्ते खराब असल्यामुळे अनेक गावांत रिक्षाशिवाय दुसरं वाहन चालू शकत नाही. काही गावांमध्ये तर वीजही नाही. अशा गावांत रिक्षाच्या बॅटरीला वायर जोडून तो दाखवला.

 एकदा बडेवाडी गावात गेलो, तेव्हा तिथली पोरं गाडीच्या मागे धावू लागली. शाळेच्या दारात गाडी थांबली तेव्हा "कुणासाठी धावताय? गाडीत कोण आहे," असं कार्यकर्त्यांनी पोरांना विचारलं, तर 'वर्षा देशपांडे' असं उत्तर मिळालं. "तुम्हाला त्या कशा ठाऊक?" असं विचारताच पोरांनी लघुपटाचा संदर्भ दिला. आशा कार्यकर्त्यांनी या गावात मुलींचे दोन गट तयार केले होते. त्यातल्या एका गटाला सावित्रीबाई फुले यांचं तर एका गटाला चक्क माझं नाव दिलंय, अशीही माहिती मिळाली. गटांना नावं देण्याचे स्वातंत्र्य आम्ही प्रत्येक गावातल्या मुलींना दिलं होतं. मुलींनी शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यापासून कल्पना चावला, सानिया मिर्झा, पंकजा मुंडे यांचीही नावं गटांना दिली होती. गावच्या मंदिरात दाखवल्या गेलेल्या लघुपटानं आपल्याला चक्क सेलिब्रिटी बनवल्याचा अनोखा आनंद त्याक्षणी मला झाला. रिक्षावाला गावात लघुपट दाखवायचा आणि व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवायचा. लघुपट बघितल्यावर मुलींना एक वही दिली जायची आणि मुली त्यात प्रतिक्रिया लिहायच्या. त्या

४८