पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
आठ

 


 एखादं नाटक, एखादा सिनेमा किंवा कोणतीही कलाकृती समाजात खरोखर काही बदल घडवू शकते का? इतका प्रभाव एखाद्या कलाकृतीचा असतो का? ज्यांचे अनुकरण पटकन होतं, अशा उथळ सिनेमांची बात सोडा; पण एखादा विचार घेऊन येणारी कलाकृती खरोखर बदलाची, परिवर्तनाची वाहक ठरू शकते का? फारशी शाश्वती वाटत नव्हती; पण प्रयोग करून बघायला हरकत नव्हती. लोकांशी थेट बोललं, तर ते कसा प्रतिसाद देतील याचा अंदाज नव्हता. मग कलेच्या माध्यमातून तो का साधू नये? एक कथानक पूर्वीपासूनच मनात घोळत होतं. जालना जिल्ह्यात घडलेली सत्यकथा. एका बालविवाहाची. त्यावर आधारित लघुपट तयार करायचा, असं सगळ्यांनी ठरवलं. लिखाणातही सगळ्या कार्यकर्त्यांचा सहभाग. गाडीतून प्रवास करतानासुद्धा चर्चा, लिखाण सुरू होतं. पण निर्मितीसाठी पैसे कुठून आणायचे, या प्रश्नावर घोडं अडत होतं; पण त्यावरही तोडगा निघाला. अनायसे मला नुकतेच काही पुरस्कार मिळाले होते. त्यांच्या रोख रकमांमधून लघुपट काढायचं ठरलं. कुणीही अनुभवी नव्हतं. कसलेले कलाकार नव्हते. कार्यकर्त्यांनीच कामं करायची असं ठरलं. सातारच्या काही पत्रकारांनीही अभिनय केला. खटाव तालुक्यातल्या डिस्कळ गावात शूटिंगचं शेड्यूल ठरलं.

४७