'लेक लाडकी'... लेक लाडकी अभियानचं पहिलं पुस्तक, लेक लाडकी व्हायला हवी. नकोशी होता कामा नये, यासाठीच्या संघर्षाची ही सुरुवात. गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यामुळे ‘पुरवठा' थांबेल; पण गरज आहे ‘मागणी' थांबवण्याची, हे लक्षात आल्यामुळे आखून-रेखून काम सुरू झालं. विविध समाजघटकांना प्रशिक्षित करणंच महत्त्वाचं होतं. बीड जिल्ह्यात १५० लोकांच्या प्रशिक्षणानं सुरुवात झाली. ग्राम आरोग्य, पोषण आणि स्वच्छता समितीपर्यंत पोहोचणं, त्या समित्या सचेत करणं आणि त्यांच्यामार्फत गर्भलिंगनिदान करू पाहणाऱ्यांंचं मतपरिवर्तन करणं, हा प्रशिक्षणाचा हेतू. मोठी यंत्रणा तयार केल्याखेरीज ‘मागणी' थांबणार नव्हती. उद्घाटनाच्या सत्राला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, आरोग्य अधिकाऱ्यांंसह वेगवेगळ्या सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. त्या काळात घेतलेल्या ग्रामसभा आणि महिला सभा आठवल्या तरी कोणत्या परिस्थितीत आपण काम सुरू केलं, याच्या स्मृती ताज्या होतात. काही आठवणी तर खूपच रोचक आहेत.
लाल बावटा पक्षाची कार्यकर्ती असणारी आमची एक मैत्रिण एका गावाची सरपंच झाली होती. तिचा प्रेमविवाह झाला होता आणि तिला दोन मुली होत्या. २६ जानेवारीला ग्रामसभा घेण्यापूर्वी २५ तारखेला महिलांची सभा. हुंडा द्यायचा-घ्यायचा नाही, मुलगा- मुलगी तपासायला गावातल्या कुणी जायचं नाही, बायकांशी दुजाभाव करायचा नाही, असे ठराव सभेत मंजूर झाले. गावात मुला-मुलींच्या संख्येचा फलक लावायचंही ठरलं. संख्येतली वाढ-घट लक्षात यावी