पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


  कम्युनिटी किचनचा विचार डोक्यात घोळत होताच. लोकांना जेवू घालणं अधिक महत्त्वाचं होतं. गावकऱ्यांंना संध्याकाळचं जेवण या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून मिळावं, अशी अपेक्षा होती. गावकऱ्यांंनी दिवसभर मिळेल ते काम करावं आणि संध्याकाळी जेवायला यावं, संपूर्ण गावानं एकत्र येऊन जेवावं, अशी योजना डोक्यात घोळत होती. परंतु त्याच वेळी गावक-ऱ्यांंकडून एक सूचना आली. गावात जेवण देण्याऐवजी चाराछावणीत जनावरांसोबत राहणाऱ्या माणसांना जेवण देणं अधिक गरजेचं आहे, असं समजलं. जनावरांसोबत घरातला एक माणूस छावणीत राहायचा. घरून त्याला भाकरी-कालवण पोहोचवलं जायचं. पण बऱ्याच वेळा कालवण विटून जायचं. त्यामुळं छावणीतल्या लोकांना संध्याकाळचं जेवण देण्याची सूचना योग्य वाटली. मग रोज वेगवेगळ्या छावण्यांमध्ये जेवण घेऊन जाण्याचा आमचा शिरस्ता सुरू झाला. छावणीची निवड आणि तिथलं सगळं नियोजन आशा कार्यकर्त्या करायच्या. आम्ही संध्याकाळी जेवण घेऊन जायचो. गावकऱ्यांंशी गप्पा मारता- मारता आम्हीही त्यांच्या पंक्तीत जेवायचो. जेवणानंतर माझं भाषण आणि लघुपटाचं प्रदर्शन असा कार्यक्रम असायचा. गावोगावच्या लोकांशी यामुळे आमची जवळीक वाढत होती. ओळखीपाळखी होत होत्या. या लोकांची जीवनशैली, मानसिकता, व्यथा-वेदना जवळून पाहायला मिळत होत्या. शेअर करता येत होत्या. नकळत आमच्यात आणि गावकऱ्यांंच्यात एकजिनसीपणा येऊ लागला होता. आम्हाला जे काम करायचं होतं, ते यामुळे सुकर होणार होतं. लोकांची मदत मिळणार होती.

  आज या कालखंडाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा असं वाटतं की, निसर्गानं मला जणू ही संधीच दिली होती. ओसाड गावं, भेगाळलेल्या जमिनी, पाण्यासाठी तडफड, अशा काळात जर आपल्या हातून काही झालं नसतं, तर पुढे लोकांनी आपल्याला दाराशी उभं तरी केलं असतं का? “जेव्हा आम्ही दुष्काळानं होरपळत होतो, तेव्हा कुठे गेला होतात," असं विचारलं नसतं का? दुसरीकडे असंही वाटतं की, ही परिस्थिती जवळून पाहिल्यामुळे, लोकांमध्ये मिसळल्यामुळे पुढे जे काही हातून घडलं, त्यात संवेदनशीलता राहिली. केवळ कायद्याचा बडगा, धाक न राहता लोकांना जाणून घेऊन, जवळ घेऊन केलेलं काम अधिक टिकाऊ ठरतं. निसर्गानं या भागातल्या लोकांशी जोडलेलं नातं असंच नैसर्गिक आहे, हे क्षणोक्षणी जाणवत राहतं.

कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf
३९