पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  आमच्या कामाची मुहूर्तमेढ रोवली जात होती, तीच दुष्काळानं भेगाळलेल्या जमिनीत. गावंच्या गावं ओस पडू लागलेली. सगळ्याच गावांमध्ये भयावह पाणीटंचाई. रोजगार हमीची कामं तालुक्यात सुरू झाली होती. केवळ मजूर वर्गातली माणसंच नव्हे तर बड्या घरातल्या, कष्टाची सवय नसलेल्या बायाबापड्यांनाही रोजगार हमीच्या कामांवर जाणं भाग पडू लागलं होतं. त्यातल्या त्यात शेतमजुरांनाच ही परिस्थिती त्यातल्या त्यात सुसह्य होती; कारण त्यांना कष्टाची, प्रतिकूलतेची सवय होती. दुष्काळ निश्चित करण्याचे, भरपाई-मदत देण्याचे सरकारी निकष आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन-अस्मानाची तफावत जाणवत होती. एखाद्याकडे किती जमीन आहे, नुकसान किती झालं, भरपाई किती द्यायची, असे निकष दुष्काळापेक्षा अधिक कोरडे वाटू लागलेले. या निकषांना मानवी चेहराच नव्हता. माणूस या घटकावर दुष्काळाचे जे दूरगामी परिणाम होतात, त्याचं प्रतिबिंब सरकारी कागदात दिसत नव्हतं. दुष्काळी परिस्थितीत जास्त काम करावं लागतं आणि जेवण मात्र पुरेसं मिळत नाही. बायकांची परिस्थिती तर अधिकच चिंताजनक. कारण आपल्याकडे प्रत्येक बाबतीत बायकांचा विचार सगळ्यात शेवटी केला जातो. त्यांच्या शरीरातली हिमोग्लोबिनची पातळी इतकी खाली जाते की, काही बायकांना सहा-सहा महिने पाळीच येत नाही, हे धक्कादायक वास्तव समजल्यावर मी जागच्या जागी थिजले होते. रोजगार हमी योजनेच्या कामावर बायकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना घेऊन आम्ही गेलो, तेव्हाच हे वास्तव मला बायकांच्या बोलण्यातून समजलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी बायकांना गोळ्या-औषधं दिली. पण....

  बायकांची ही अवस्था मला इतकी चटका लावून गेली, की त्यानंतर यूएनएफपीएच्या दिल्लीतल्या बैठकीत जेव्हा मी ही बाब सांगितली, तेव्हा मला रडू कोसळलं होतं. धनश्री आणि शोभना या यूएनएफपीएच्या प्रकल्प प्रमुखही ऐकून गहिवरल्या होत्या. आपल्याला जिथं काम करायचं आहे, तिथं अशी परिस्थिती असेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, असं बैठकीत सगळ्यांचंच मत पडलं. आम्हाला 'कम्युनिटी किचन' सुरू करण्याची इच्छा होती आणि त्यासाठी समाजातल्या दानशूरांना आवाहन करण्याचे आम्ही ठरवलं. त्यासाठी फेसबुक पेज तयार केलं. क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीनं मोठी मदत देऊ केली. तोपर्यंत मी त्या भागात फिरकलेच नाही. आपल्या हातात काही नाही, आपण देऊ काहीच शकत नाही आणि डोळ्यापुढे दिसणारी परिस्थिती पाहवतही नाही, मग कशाला जायचं? शुद्ध पाणी विकत घेताना लाज वाटायची. जेवतानाही अपराधी वाटायचं. हळूहळू मदत जमा होत राहिली आणि बऱ्यापैकी पैसे जमल्यावरच

३६