पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.पाच

 


 आम्ही वणवा तर विझवला; पण मुळात तो लावतो कोण? कशासाठी? या प्रश्नांची उत्तरं शोधल्याशिवाय चैन पडणार नव्हतं. बाजारपेठेच्या भाषेत बोलायचं तर आम्ही 'पुरवठा' बंद करत होतो; पण 'मागणी'चं काय? काही दाम्पत्यं आता परराज्यात जाऊ लागलीत, अशा चर्चा कानावर येऊ लागल्या. लोकांना का नकोशा झाल्यात मुली ? ठरलं, शोधून काढायचंच! अगदी शास्त्रीय पद्धतीनं. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटिकल सायन्सच्या मदतीनं संशोधन करायचं ठरवलं आणि बीड जिल्ह्यात मुलींची संख्या सर्वात कमी असलेला शिरूर कासार तालुकाच निवडला. २०११ च्या जनगणनेनुसार, दरहजारी मुलांमागे तिथं अवघ्या ७८० मुली होत्या. तालुक्यातल्या २५० अशा गर्भवती शोधून काढल्या, ज्यांना यापूर्वी मुली झाल्या आहेत. यादी तयार करून आरोग्य विभागाकडून माहिती मिळवली. आशा सेविकांकडून समन्वयाचं काम सुरू केलं. गोखले इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या प्रश्नावलीतले प्रश्न या गर्भवतींना विचारले. त्यासाठी बीड जिल्ह्यातल्याच मुली निवडल्या. फील्डवर्क आम्ही केलं आणि जमवलेल्या माहितीचं विश्लेषण आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटनं केलं. ७६ टक्के सोनोग्राफी यंत्रं ऊस आणि दुधाचे उत्पादन जास्त असलेल्या पट्ट्यात आहेत आणि त्यामुळे या भागात मुलींची संख्या कमी होत चालली आहे, हे सर्वेक्षण पूर्वी गोखले इन्स्टिट्यूटनंच केलं होतं. अशा संस्थेच्या माध्यमातून आम्ही बीड जिल्ह्यात सर्वेक्षण केलं. स्विस एड या आर्थिक मदत करणाच्या आंतरराष्ट्रीय संस्थेनं त्यासाठी आम्हाला अर्थसाह्य दिलं.

२९