पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/24

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


किंवा सामाजिक संस्थांनी आंदोलनं केली, कायदे करण्यास सरकारला भाग पाडलं म्हणूनच त्यांच्या हक्कांचं संरक्षण झालं. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारी यंत्रणा अधिक संवेदनशील आणि सक्षम असणं अतिशय गरजेचं असतं आणि त्यासाठीही पुन्हा सामाजिक संस्थांनाच डोळ्यांत तेल घालून काम करीत राहावं लागतं, हा आमचा विचार. मुलींना जन्माला येऊच द्यायचं नाही, ही प्रवृत्ती रोखून काम कधीच पूर्ण होणार नाही. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, त्यांना सक्षम करणं, एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही, याची दक्षता घेणं कितीतरी महत्त्वाचं आहे. यामुळेच हक्कांची जाणीव असलेली एक पिढी तयार होईल, हा आमचा मूळ विचार न्या. सुजाता मनोहर यांच्या भाषणामुळे अधिक दृढ झाला.

 मुलींना शिक्षणाची ग्वाही देणाऱ्या कायद्यापासून बालविवाह रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यापर्यंत अनेक विषयांवर त्यांनी भाषणात विस्तृत चर्चा केली. कायदे आणि सरकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी सतर्क राहायला हवं, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. जातिधर्मावर आधारित असलेले पर्सनल कायदे, कस्टमरी कायदे हे रूढी परंपरांनुसार तयार झालेले आहेत आणि घटनेनं स्त्री-पुरुष समानतेची जी ग्वाही दिली आहे, त्या तत्त्वांना ते कसे छेद देतात, हे त्यांनी सांगितलं. राज्यघटना आणि पर्सनल कायद्यांमधला विरोधाभास दाखवून देणारी उदाहरण दिली. कायद्यातील काही तरतुदींमुळंही कशा अडचणी निर्माण होतात, हे सांगताना त्यांनी विशाखा गाइडलाइन्सचं उदाहरण दिलं. कायदा अस्तित्वात नसतानाही कामाच्या ठिकाणी महिलांना संरक्षण मिळण्याचा प्रयत्न या गाइडलाइन्समुळे झाला. परंतु नव्यानं अस्तित्वात येणारा कायदा महिलांना उलट अधिक असुरक्षित करेल की काय, अशी धास्ती कशामुळे निर्माण झाली, याचं विवेचन करून कायदे तयार होत असतानाही महिला संघटनांनी सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बलात्कारासारख्या गुन्ह्यांची हाताळणी करण्याची यंत्रणाही सक्षम नसल्यामुळे कायद्याच्या जोडीला आंदोलनं आणि संघटनांची सजगता कशी आणि किती उपयुक्त ठरते, याबाबत त्यांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी माझ्या कायम लक्षात राहिल्या. याच कार्यशाळेत महिलांना आरक्षणाबरोबरच संरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी जाणीवजागृती करण्याचा निर्णय झाला. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. रत्नागिरीपासून गडचिरोलीपर्यंत आणि कोल्हापूरपासून धुळ्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून साठ निमंत्रित सदस्य या कार्यशाळेला उपस्थित होते. ही कार्यशाळा मला पुढे खूपच मार्गदर्शक ठरली. याखेरीज आपण

२०