पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"आमच्या कार्यकर्त्यांची स्टेटमेन्ट घ्यायला नांदेडला या," असं मी त्यांना सांगू पाहत होते. पण पलीकडून दोनतीनदा ‘हॅलो, हॅलो' असा आवाज आला आणि फोन कट झाला. पुढे तीन दिवस सिव्हिल सर्जनचा फोन बंदच होता. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी.... सगळ्यांचे फोन अचानक बंद! याचा अर्थ, आम्ही जे केलं होतं त्याची माहिती परळीत आणि विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांंच्या वर्तुळात पसरली होती आणि पुढची कारवाई कशी करायची, असा पेच उभा राहिला होता.

 अखेर ही सगळी माहिती अशोक चव्हाण यांच्या स्वीय सहायकाला कळवली. वरूनच चक्रं फिरली. अंबाजोगाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जोशी तब्बल शंभर पोलिसांचा फौजफाटा घेऊन डॉ. मुंडे हॉस्पिटलवर कारवाई करण्यासाठी पोहोचल्याचं समजलं. दरम्यान, आम्हाला आणखी एक धक्का बसला. शैलाताई, तस्लिमा आणि कैलास यांनी अधिक पुरावे म्हणून आपली नावं, कोणत्या दिवशी किती वाजता आपण मुंडे हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीसाठी आलो होतो, हे तिथंच वेगवेगळ्या ठिकाणी पेनानं लिहून ठेवलं होतं. वॉशरूममध्ये फ्लशच्या टाकीच्या खाली, टॉयलेटच्या भिंतीवर, बाकाच्या खाली तसा मजकूर त्यांनी लिहिला होता. ही मंडळी आमच्या दवाखान्यात आलीच नव्हती, असं उद्या कुणी म्हणायला नको! या पुराव्यांची कल्पना आम्ही राजेंद्र जोशी यांना दिली. पण त्यांनी फोनवरून सांगितलं की, अशा प्रकारचा मजकूर कुठेच दिसत नाही. जी-जी ठिकाणं आम्ही सांगितली होती, तिथं नव्यानं रंग मारल्याचं त्यांना दिसलं होतं. ही जादू कशी झाली? कुणाकडून माहिती बाहेर गेली? की कारवाईचे संकेत मिळताच हॉस्पिटलची पाहणी करून संशयास्पद गोष्टी गायब करताना हा मजकूरही गायब केला गेला? काहीच कळायला मार्ग नाही... आजअखेर!

 दुसऱ्या दिवशी तमाम वर्तमानपत्रांमध्ये मथळा होता : डॉ. मुंडे हॉस्पिटलला पोलिस छावणीचे स्वरूप! सोनोग्राफी मशीन सील झालं होतं. पण इथंही बीडसारखीच तऱ्हा. समोरच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातले रेडिओलॉजिस्ट डॉ. गिते यांच्या नावावर सोनोग्राफी मशीनचं रजिस्ट्रेशन! गुंतागुंत वाढत होती. तणाव कायम होता. पण अखेर साताऱ्याला येऊन आमच्या कार्यकर्त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले गेले. खटला चालला, कार्यकर्त्यांच्या साक्षी झाल्या आणि डॉक्टरांना चार वर्षांची शिक्षाही लागली. पण २०१० मधल्या या कारवाईनंतर जामिनावर मुक्त झालेल्या डॉ. मुंडे यांच्या बाबतीत पुढे काय-काय घडलं, हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. २०११

१६