पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



तीन

 

 गर्भलिंग निदान चाचणीविरोधी कायद्याबद्दल सर्वांनाच जागरूक आणि संवेदनशील बनवणं आवश्यक होतं. अगदी न्यायव्यवस्थेतील व्यक्तींपासून सरकारी अधिकारी आणि पत्रकारांपर्यंत. न्यायाधीशांच्या कार्यशाळा तर सुरूच होत्या. याव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांंची पंढरपुरात कार्यशाळा घेतली. याच जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विभागातले ग्रामीण पत्रकार निमंत्रित करून त्यांची तीन दिवसांची कार्यशाळा सोलापुरात झाली. अशा कार्यशाळा असोत, बैठका असोत किंवा आशा कार्यकर्त्यांशी वेळोवेळी होणारा संवाद असो, परळीचं नाव निघायचंच, गर्भलिंग चाचणीसाठी लोक परळीला मोठ्या संख्येनं जातात अशा चर्चा सर्वच ठिकाणी होत असत. गुलबर्ग्याचंही नाव चर्चेत होतं. पण परळीचा उल्लेख सतत व्हायचा. या चर्चेची शहानिशा करणं गरजेचं वाटू लागलं. याच दरम्यान न्यायाधीशांच्या कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून अनुभवकथनासाठी मला नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात बोलावलं होतं. त्याच फेरीत परळीत धाडस करायचं ठरलं.

 हो, धाडसच! डॉ. सुदाम मुंडे हे नाव आता संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण त्याच काळात डॉ. मुंडे यांच्याबद्दल आम्हाला अनेक किस्से ऐकायला मिळाले होते. या प्रकरणात हात घालणं खूपच धोकादायक आहे, असं खुद्द सिव्हिल सर्जनसह अनेकांकडून ऐकायला मिळालं होतं. अगदी ‘तुम्हाला मारून टाकतील,' ‘खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाईल,' असेही इशारे मिळाले होते. पण कार्यकर्ते हा धोका पत्करायला तयार झाले होते. वाल्मीक भिलारे हा एकेकाळचा आमचा खंदा

१२