पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेवाचताना संबंधित डॉक्टरांच्या डिग्र्याही अनोळखीच वाटत होत्या. या डिग्र्या तरी खऱ्या असतील का, हा प्रश्न पडत होता. आशा सेविकांच्या बैठकीतून काही मुद्दे रेकॉर्डवर येतच होते. त्यांची खातरजमा केली, तेव्हा आणखी एक धक्का बसला. दवाखान्यांवर सोनोग्राफीच्या पाट्या असल्या, तरी कुठेच सोनोग्राफी मशीन मात्र नव्हतं. पेशंटला बीडला किंवा परळीला पाठवलं जायचं. केवळ 'रेफरल'चा व्यवसाय तेजीत सुरू होता. सुबत्ता असणाऱ्या भागातल्या लोकांना खरंही वाटणार नाही अशी भयावह परिस्थिती! धास्ती होती. परिसर अनोळखी होता. लोकांची मानसिकता, आर्थिक संरचना, सामाजिक गुंतागुंत, राजकीय ताणेबाणे... कशाकशाचा पत्ता नव्हता. प्रश्नार्थक मुद्रेनं आम्ही मोजके कार्यकर्ते एकमेकांकडे पाहत होतो. पण सगळ्यांनाच एकमेकांच्या डोळ्यात एक निर्धार दिसत होता - होय! आता हेच आपलं कार्यक्षेत्र !

कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf
११