मुला-मुलींच्या संख्येत एवढा असमतोल असणारा महाराष्ट्रातला हा एकमेव जिल्हा ठरल्यामुळं संपूर्ण देशाचं लक्ष बीडकडे वळलं. या समस्येबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पूर्णविराम देणं हाच आता शहाणपणा होता. मुला-मुलींच्या संख्येत तफावत असणारे अन्य जिल्हे पंजाब आणि हरियाणातील होते. ब्लॉक पातळीवरची आकडेवारी तपासताना एक धक्कादायक माहिती समोर आली. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा ब्लॉकमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण सर्वांत कमी होतं. दुसरा क्रमांक होता बीडमधल्या शिरूर-कासार ब्लॉकचा. बीडमधले वडवणी आणि धारूर हे तालुकेही मुलींच्या अत्यल्प संख्येचे तालुके म्हणून समोर आले.
शहरी, सुस्थिर आणि श्रीमंत कुटुंबंच मुलाचा आग्रह धरतात. त्यांना मुली नको असतात. प्रॉपर्टीला वारस हवा असतो. त्यामुळं शहरी श्रीमंतांमध्ये गर्भलिंग निदान करण्याचं प्रमाण अधिक असतं, असं आतापर्यंत आम्ही समजत होतो. पण वाळवा आणि शिरूर हे दोन्ही परस्परविरोधी परिस्थिती असलेले ब्लॉक या बाबतीत आघाडीवर असल्याचं पाहून आमच्या गृहितकांना तडा गेला. माहिती मिळवून मीमांसा केल्यानंतर यामागची कारणं उलगडत गेली. वाळवा ब्लॉक ऊस पट्ट्यातला. साखर कारखान्यांनी समृद्धी आणलेला. शिरूर कासार ब्लॉक गरीब कुटुंबांचा. ऊसतोडीसाठी हंगामी स्थलांतर करणाऱ्या मजुरांचा हा तालुका. दोन्हीकडच्यांना मुली नको आहेत, असं का? या प्रश्नाचा पाठलाग करताना धक्कादायक वास्तव उलगडत गेलं.
दोन्हीकडच्या परिस्थितीचा संबंध स्त्रियांच्या कामाशी, मेहनतीशी आहे, हे नवं समीकरण लक्षात आलं. ग्रामीण स्त्रिया शेतीभातीत काम करणाऱ्या. त्यांच्या कामाचा मोबदला दूरच; पण त्या कामाची दखलही घेतली जात नाही, हे तर आपण सगळेच जाणतो. ऊसपट्ट्यात उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती केली जात असल्यामुळे स्त्रियांसाठी फारसं कामच उरलेलं नाही. म्हणूनच मग मुली नकोशा झाल्यात. दुसरीकडे, बीडसारख्या जिल्ह्यातल्या प्रचंड मेहनत करणाऱ्या स्त्रिया दिसतात. किंबहुना तिथं सर्वांत मोठी ‘वर्कफोर्स' स्त्रियांचीच आहे; पण तिथं त्या असुरक्षित आहेत. त्या कामानिमित्त ज्या भागात स्थलांतर करतात तिथेही त्या सुरक्षित नाहीत आणि त्या स्थलांतरित झाल्यानंतर गावाकडे ठेवलेल्या त्यांच्या मुलीही सुरक्षित नाहीत. म्हणून पोटी मुलगी नकोय. मुलींची संख्या घटत गेल्यामुळं मग लैंगिक गुन्हेगारी वाढत जाते. मन सुन्न करणारी बाब म्हणजे, आपल्या मुलीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्याचं कुणालाच काही फारसं वाटत नाही; पण बदनामी नको असते.