पान:कोयत्याच्या मुठीत (Koytyachya Muthit).pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
दोन


 ऐन गणेशोत्सवात बीडमध्ये झालेलं स्टिंग ऑपरेशन आणि त्यामुळं तिथं राजरोसपणे सुरू असलेल्या गर्भलिंग चिकित्सेच्या व्यवसायाला बसलेला तडाखा ही मोठी घटना होती. जणूकाही गर्भलिंग चिकित्सेत काही गैर नसतंच, अशा मानसिकतेत जगणारे खडबडून जागे झाले होते. त्यातच आम्हाला 'बाहेरचे’ आणि ‘सुपारी घेऊन बदनामी करणारे' ठरवलं गेलं होतं. त्यामुळं एकदा बीड जिल्ह्याच्या हद्दीतून बाहेर पडल्यावर नजीकच्या काळात पुन्हा बीडला जाणं होईल, असं वाटलंच नव्हतं. परंतु गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव आला आणि आम्हाला चक्क मानानं बोलावलं गेलं. दुर्गेचा उत्सव साजरा करणा-यांनी माझा आणि शैलाताईंचा साडी देऊन सत्कार केला.

 इकडे, स्टिंग ऑपरेशनच्या वेळी दवाखान्यातून पळ काढणारे डॉ. सानप चार दिवसांनी स्वतः हजर झाले. त्यांना न्यायालयीन कोठडी आणि नंतर जामीन मिळाला. या एकाच प्रकरणात खूप मोठी गुंतागुंत होती. सोनोग्राफी ज्या इमारतीत झाली, ती डॉ. सानप यांच्या मालकीची. सोनोग्राफीचं मशीन त्यांचे सासरे डॉ. लहाने यांच्या मालकीचं. रेडिओलॉजिस्ट डॉ. निराळे यांच्या परवान्यावर ते वापरण्याची परवानगी डॉ. लहाने यांनी दिलेली आणि सोनोग्राफी केली होती सिव्हिल हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉ. सय्यद यांनी. म्हणजेच या एकाच प्रकरणात चार आरोपी झाले आणि गुंतागुंत वाढली. खटल्याच्या सुनावणीसाठी आमचं बीडला येणं-जाणं वाढलं. त्याच दरम्यान तिथं गर्भलिंग निदानविरोधी कायद्यासंदर्भात (पीसीपीएनडीटी) रेडिओलॉजिस्टची बैठक नियमितपणे होते का, याची चौकशी आम्ही सुरू केली. एवढंच नव्हे तर तशी बैठक घेतलीही. डॉक्टरांमध्ये घबराटीचं, तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.