मनावरचे दोन ताण । ४९
कोणी कांही आक्षेप घेतल्यास या लोकांच्या विसंगत आचरणावर ती टीका आहे, असे ते म्हणत. मूर्तिपूजेचा सभेत निषेध करून घरी मूर्तिपूजा करणारे, सभेत प्रायश्चित्त, व्रतें-वैकल्ये यांचा निषेध करून घरीं तीं आचरणारे, धर्मसुधारणावादी पत्रकावर सह्या घेऊन मागून शरणागति पतकरणारे, समुद्रप्रवासबंदीचा निषेध करून स्वतः ती पाळणारे यांचा ते उपहास करीत असत.
स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, प्रौढविवाह, शूद्र-अतिशूद्र यांची उन्नति, अस्पृश्यता-निवारण, जातिभेदविनाश या सर्वांविषयी शास्त्रीबुवांची अशीच भूमिका आहे. या क्षेत्रांत सुधारणा करू पाहणारांवर त्यांनी सतत धार धरली आहे. यासंबंधी 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत त्यांनी खुलासा केला आहे. ते म्हणतात, "वरील कोट्यांचें आम्हीं जें खंडन केलें आहे. त्यावरून कित्येक समंजस मंडळींचें असें अनुमान होईल की, वरील बालविवाहादि प्रकार आम्हांस सर्व प्रकारे मान्य होत व आजपर्यंत जे चालत आले आहे. तें सर्व जसेच्या तसे ठेवण्याविषयी आमचा आग्रह आहे. वस्तुतः पाहतां वरील मतें काढण्यास बिलकुल आधार नाही. आमचें म्हणणे इतकेंच की आज जी आमची अवस्था झाली आहे तिला ते कारणीभूत आहेत या म्हणण्यांत कांही अर्थ नाही."
सत्याचा विसर
विष्णुशास्त्री यांचें हें निरनिराळ्या निबंधांतले प्रतिपादन पाहिले म्हणजे सामाजिक व धार्मिक क्रांति ही लोकशाहीसाठी अवश्य आहे; याकडे त्यांनी दुर्लक्ष केलें होतें असें दिसतें. ते लोकसत्तावादी होते, प्रजासत्ताक हे त्यांचे स्वप्न होतें, असें आगरकर म्हणतात; आणि विचारस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य यांचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला आहे आणि लोकप्रभुत्व व स्वातंत्र्य यांविषयीच्या आकांक्षा प्रकट केल्या आहेत, यांवरून त्याविषयी शंका राहत नाही; पण लोकशाहीला लोकनिर्मिति अवश्य असते. धार्मिक, सामाजिक, जातीय इत्यादि सर्व बंधनांपासून मुक्त असे नागरिक उदयास आल्यावांचून लोकसत्ता सिद्ध होऊं शकत नाही या सत्याचा त्यांना विसर पडला होता, असें म्हणावें लागतें. धार्मिक, सामाजिक रूढि व इतर पीठिका तशाच चालू ठेवाव्या, असा आमचा आग्रह नाही, असें ते म्हणतात. पण लोकशाहीला, प्रगतीला त्यांच्या निर्मूलनाची आवश्यकता नाही असें त्यांना वाटते. तसें त्यांना वाटत नसतें तर त्यांनी भाषाभिमान, ग्रंथरचना, इतिहाससंशोधन यांचा जसा हिरिरीने पुरस्कार केला तसा सामाजिक व धार्मिक क्रांतीचाहि केला असता.
मानव अपूर्ण
लोकशाही, विचारस्वातंत्र्य, लोकमतांविरुद्ध जाण्याचा व्यक्तीचा अधिकार पाश्चात्त्य विद्येची उपासना यांचा पुरस्कार करणाऱ्या पुरुषाने धार्मिक व सामाजिक क्रांतींचें महत्त्व जाणलें नव्हतें, हें जरा विस्मयजनक आहे. पण कोणताहि मानव पूर्ण नाही, हें ध्यानांत घेतलें म्हणजे मनाचा त्रास जरा कमी होतो. गांधीजी लोकशाहीचे
के. त्रि. ४