Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४८ । केसरीची त्रिमूर्ति


सर्वांगीण क्रांति
 भारतात ब्रिटिश सत्ता स्थापन होण्यापूर्वी अनेक शतकें सर्वत्र राजसत्ताच होती तिच्या खालच्या पायरीवर सरदार- जहागीरदार, इनामदार, खोत, सरंजामदार यांची सत्ता असे. शिवाय धर्मपीठांची व जात पंचायतींची अत्यंत अनियंत्रित आणि बेजबाबदार अशी सत्ताहि सर्वत्र होती. या सत्तांमुळे व त्यांनी घातलेल्या आचार-विचारांवरील असंख्य बंधनांमुळे येथल्या सामान्य जनांना कसलीहि प्रतिष्ठा नव्हती. त्यांचें मानवत्वच शून्य झालें होतें. ज्यांचा स्पर्शहि इतरांना चालत नाही त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा ती कसली असणार ? असा मनुष्य निर्भय कसा होणार ? तो अन्यायाचा प्रतिकार कसा करणार ? राजसत्तेवर नियंत्रण कसें घालणार ? म्हणजेच त्याला नागरिक ही पदवी कशी प्राप्त होणार ? ही पदवी त्याला प्राप्त व्हावयाची तर धार्मिक, सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारची क्रांति भारतांत होणें अवश्य होतें. त्यावांचून येथे लोक निर्माण होणें अशक्य होतें.
 भारतांत लोकसत्ता यावी अशी आकांक्षा असलेले विष्णुशास्त्री यांची या बाबतींत काय मतें होतीं ? कोणता दृष्टिकोन होता ?
भूमिका
 'वक्तृत्व-पत्रास उत्तर' या लेखांत त्यांनी म्हटलें आहे की, "विद्यमान धर्म अत्यंत दुष्ट असून त्यास अनुसरल्याने आपल्या देशबांधवांचे फार अकल्याण होत आहे असें मनापासून वाटून, तो नष्ट करून टाकून नवा धर्म प्रसृत करण्याचें जर कोणी मनांत आणील व त्याकरिता बुद्धिपुरस्सर, निर्मळ अंतःकरणाने तो झटेल, तर त्याचा अत्यंत द्वेष करणाऱ्या शत्रूसहि त्याची योग्यता वाखाणावी लागेल." पण अशी वृत्ति असूनहि 'चालू हिंदु धर्म नव्या पंथांच्या प्रवर्तकांना जसा केवळ उपहास्य व उच्छेद्य वाटतो... तसें आम्हांस बिलकुल वाटत नाही." असेंहि त्याच लेखांत त्यांनी सांगून ठेविलें आहे.
 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत 'हिंदु धर्म हा सुधारणेस बाधक नाही,' असें सांगून अटकेपार जाणारे लष्करांतले शिपाई, इंग्लंडला जाणारां राघोबाचा वकील, जपजाप्य कमी करणारे माधवराव पेशवे यांची उदाहरणें विष्णुशास्त्री यांनी दिली आहेत; पण असे असूनहि रूढ, विद्यमान, हिंदु धर्म हिंदुस्थानच्या अवनतीस कारण झाला, हें विष्णुशास्त्री यांना मुळीच मान्य नव्हतें. प्राचीन काळीं आमची सुधारणा झाली त्या वेळीं येथे हाच धर्म होता, तेव्हा तो प्रगतीच्या आड आला नाही, मग आताच कां यावा, असें तें विचारतात.
विरोध नाही
 हिंदु धर्म हा सुधारणेस बाधक नाही, त्या संबंधांत कोणी कोणतेंहि मत मांडलें तरी चालेल, असें विष्णुशास्त्री यांनी म्हटले असले तरी प्रार्थनासमाज, ब्राह्मो समाज, आर्यसमाज यांच्या प्रवर्तकांवर त्यांनी अतिशय उपहासाने टीका केली आहे. याविषयी