Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४२ । केसरीची त्रिमूर्ति

विषयी पुढे आगरकरांनी जीं मतें मांडलीं तींच विष्णुशास्त्री यांनी निबंधमालेंत मांडली आहेत; आणि तीं मांडतांना "या जगांत पूर्णावस्थेस पावलेलें असें कांहीच नाही" हा लोकशाहीने गृहीत धरलेला सिद्धान्त स्पष्टपणे मांडला आहे. जे लोक आपले धर्म-ग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत, अपौरुषेय आहेत, असें मानतात ते हा सिद्धान्त मान्य करीत नाहीत. कारण ते धर्म-ग्रंथ व ते धर्माचार्य प्रमादरहित असतात अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. अशी श्रद्धा वरील सिद्धान्त कधीच मान्य करणार नाही. विष्णुशास्त्री यांनी तो आवर्जून मांडला आहे. यावरून अंध धर्मश्रद्धेपासून त्यांचें मन मुक्त होतें हेंच दिसून येतें.
निकोप दृष्टि
 'जगांत पूर्ण असें कांहीच नाही' हाच भावार्थ 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत त्यांनी जास्त स्पष्टपणे मांडला आहे. ते म्हणतात, "सत्य हें एकाच राष्ट्राला, एकाच धर्माला, किंवा एकाच पक्षाला अनुसरून असतें असें नाही, तर अशोधित धातूंत जसे सुवर्णरज यदृच्छेने मिसळलेले असतात त्याप्रमाणेच सत्याचीहि गोष्ट होय. त्याचे अंश ज्यांत मिश्रित झाले नाहीत असा प्रायः कोणताहि पक्ष नाही. यास्तव एकाच पक्षाचा दृढ अभिमान धरणें हा दुरभिमान होय."
 सत्याविषयी हीच निकोप दृष्टि लोकशाहीला अवश्य असते. विष्णुशास्त्री यांनी हें चांगलें जाणलें असल्यामुळे अगदी प्रारंभापासून "आमच्या विरोधकांनाहि आमच्यावर वाटेल ती टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असे त्यांनी पुनः पुन्हा सांगितल्याचे आढळते. निबंधमालेच्या उद्देशाविषयी स्पष्टीकरण करतांना त्यांनी लिहिलें आहे की, "एखाद्या गोष्टीविषयी आम्ही जे अभिप्राय लिहू ते केवळ सत्य-निरूपणाच्याच उद्देशाने लिहूं, अशी आमची खात्री आहे व आम्ही दुसऱ्यास वाजवी रीतीने नांवें ठेवण्यास ज्याप्रमाणे मागेपुढे पाहणार नाही त्याचप्रमाणे दुसऱ्यांनी आमच्या लेखांविरुद्ध मतें प्रदर्शित केल्यास त्यांत आम्हांस अगदी वाईट वाटणार नाही. अशा रीतीने प्रदर्शित केलेलें मत कदाचित् खोटें ठरेल, पण तरीहि तो मनुष्य प्रशस्तच होय; कारण तसे न केल्यास सत्याचा निवाडा होणार नाही. मिल्टन कवीने म्हटलें आहे की, "चुकलेल्या मतांतूनच खरें मत पुढे निघतें" यास्तव आम्ही पुन्हा एकदा सर्वांस सांगतों की, "आमच्या विरुद्ध जर कोणाचे अभिप्राय असतील तर ते आम्ही मोठ्या प्रेमाने वाचूं व ते लिहिणाराचे आभार मानून आम्हांस सुचेल तें प्रत्त्युत्तरहि देऊ."
लोकमताविरुद्ध
 विचारस्वातंत्र्याचें तत्त्व मान्य केल्यावर तें स्वातंत्र्य आपल्याइतकेंच दुसऱ्यालाहि असले पाहिजे, हें मान्य करणें, नव्हे त्याचा आग्रह धरणें हें जसें ओघानेच येतें त्याचप्रमाणे एकंदर लोकमत कितीहि विरुद्ध असले तरी, त्याची तमा न बाळगतां, आपल्याला जें सत्य वाटेल तें प्रत्येकाने निर्भयपणे सांगितलें पाहिजे, हा उपसिद्धान्तहि