तेजोवलयाचा मेद । ३९
त्यांच्या त्या उन्मत्ततेचा, पाश्चात्त्य पंडितांच्या ग्रंथांच्याच आधारेच रेच उतरविणें अत्यंत अवश्य आहे असें विष्णुशास्त्री यांनी जाणलें यांतच त्यांची दृष्टि कशी काल भेदी होती याचें प्रमाण मिळतें.
इंग्रज माणूसच
हा सर्व उद्योग विष्णुशास्त्री यांनी केला यांत त्यांचा हेतु हा होता की, "मनुष्यमात्रांत जे दोष सापडतात त्यांपासून युरोपीय लोक झाले म्हणून ते तरी तिळमात्रहि मुक्त झाले आहेत असें नाही," हें हिंदी जनतेच्या ध्यानांत आणून द्यावें. आणि इंग्रजांनी आपल्याभोवती नखशिखान्त जें गूढ दैवी तेजाचें वलय निर्माण केलें होतें तें भेदून टाकून त्या झगझगाटाने हिंदी लोकांच्या दृष्टीला आलेला दीप नाहीसा करावा. तसें केल्यावांचून त्यांच्या चित्ताला आत्मप्रत्यय आला नसता; आणि आक्रमक ब्रिटिश सत्तेशी झुंज देण्याचें मनोधैर्य त्यांना लाभलें नसतें.
मात्र असे करतांना पौर्वात्य जनांच्या खऱ्या गुणांविषयी जी अज्ञानभ्रांति पाश्चात्य मनावर होती तशीच त्यांच्या गुणांविषयी हिंदी जनांच्या मनावर येऊ नये, याविषयी विष्णुशास्त्री दक्ष होते. ज्या शत्रूशी आपल्याला मुकाबला करावयाचा आहे त्याच्या गुणसंपदेविषयी आपल्या ठायीं अज्ञान असूं नये, तसें असण्यांत धोका आहे, हा विवेक शास्त्रीबुवांनी केव्हाच सोडला नव्हता. याविषयी ते फार सावध होते. म्हणूनच त्यांनी साक्षेपाने पाश्चात्त्यांचे व विशेषतः इंग्रज राज्यकर्त्यांचे गुणहि अभ्यासले आणि स्वकीयांना त्याचें उत्तम दर्शन घडविलें.
गुरु कोणत्या अर्थाने ?
लोकहितवादी, रानडे इंग्रजांना आपले गुरु मानीत. विष्णुशास्त्रीहि त्यांना गुरु मानीत. पण या दोन मानण्यांमध्ये जमीन-अस्मानाचें अंतर होते. इंग्रज हिंदी जनांचें हित चिंतितात, कल्याण करतात, अशी लोकहितवादींची, रानड्यांची श्रद्धा होती. तर विद्येच्या, ज्ञानाच्या दृष्टीने त्यांना गुरु मानावें, पण ती विद्या हस्तगत करून शेवटीं त्यांच्यावर मात करावयाची आहे, हें विसरू नये असें विष्णुशास्त्री सांगत. 'संस्कृत कविता' या लेखांत "इंग्रजी शिक्षणाने आमच्या बुद्धीस जी तीव्रता आली आहे ती आमच्या गुरूंच्याच गर्व-खंडनास अगोदर कारण होईल," असें त्यांनी म्हटले आहे.