Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेजोवलयाचा भेद । ३७

इतर माणसासारखाच बळी पडतो. हें शास्त्रीबुवांना नाना प्रकारे स्पष्ट करावयाचें होतें. त्यामुळे या निबंधांत आणि अन्यत्रहि हे इंग्रज पूर्वी रुमालाने हात बांधून शिवाजी, पेशवे, शिंदे, होळकर यांच्यापुढे उभे असत, याचा ते वारंवार निर्देश करतात; आणि या आपल्या पूर्वीच्या आश्रयदात्यांवरच आता ते कृतघ्नपणाने उलटले आहेत, हें पुन: पुन्हा नजरेस आणतात.
खराटा
 सामान्य जनांची स्थिति वर्णितांनाहि त्यांनी याच हेतूने रचना केली आहे. हिंदुस्थानांतील सामान्यजनांची स्थिति वर्णितांना त्यांनी इंग्लंडमधील सामान्य जन व हिंदी सामान्य जन यांची तुलना केली आहे; आणि आम्हांला लुटून, आमचा रक्तशोष करून पुष्ट झालेले ते लोक पाहा व आमचे मरण-पंथाला लागलेले, त्यांनी त्या पंथाला लावलेले लोक पाहा, असें ते सांगत आहेत. तेव्हा तात्पर्य काय की, या गोऱ्या बादशाहीची जिकडे जिकडे स्वारी फिरली तेथे तेथे तिजबरोबर खराटा फिरत चालला आहे. 'आमच्या देशाची स्थिति' ही अशी आहे.
पाश्चात्त्यांच्याच आधाराने
 'इंग्रजी भाषा' या निबंधांत विष्णुशास्त्री यांनी असाच पाश्चात्त्य पंडितांच्या आधारे, पाश्चात्त्यांचें सत्य स्वरूप उघड करण्याच्या प्रयत्न केला आहे. या निबंधाचा मूळ विषय तो नव्हे, पण विष्णुशास्त्री यांच्या लेखणीचा कायमचाच तो विषय आहे. ते कोणत्याहि विषयावर लिहीत असले तरी हिंदी लोकांचें स्वत्व जागृत करणें, त्यांची अस्मिता प्रबळ करणें, त्यांचा स्वाभिमान चेतविणें आणि त्याचबरोबर त्यांचा तेजोभंग करण्याचा अहर्निश प्रयत्न करणारे जे मिशनरी, राज्यकर्ते आणि पाश्चात्य पंडित त्यांचा मुखभंग करणें हेंच त्यांचें उद्दिष्ट असे. इंग्रजी भाषेच्या वृत्तान्तांत इंग्रज इतिहासकार सहजच येतात. तेव्हा ती संधि साधून त्यांनी त्यां पंडितांपैकी काहींनी आपल्याच बांधवांवर जी प्रखर टीका केली होती, तीच वरील तीन धूर्तांच्या तोंडावर फेकली नसती तरच नवल झालें असतें.
 पाश्चात्त्यांच्या मनांत इकडील लोकांविषयी ज्या वृत्ति वागत असतात त्यांचे दूषण तिकडीलच एका नामांकित ग्रंथकाराने किती तीव्रतेने केलें आहे पाहा- अशी प्रस्तावना करून त्यांनी ऑकले नांवाच्या इतिहासकाराचा उतारा दिला आहे. तो म्हणतो, पूर्वेकडच्या देशांना ज्ञानकिरण परमेश्वर देतो तसे तो आपल्याला देत नाही. पण 'जगापेक्षा आपण जास्त शहाणे आहों' असा भ्रांत अहंभाव आपल्या ठायीं निर्मून त्याने त्या उणिवेची भरपाई केलेली आहे. ही भ्रांति मोठी सुखद असते; आणि ती नष्ट करून अशा लोकांचे डोळे उघडणें म्हणजे मोठें क्रूर कृत्यच आहे; पण केव्हा केव्हा त्यांना त्यांचें सत्य स्वरूप दाखवावें लागतें. पौर्वात्यांना रानटी, वन्य, समजून त्यांना तुच्छ लेखणें हा केवळ मूर्खपणा होय. क्वचित् एखादे वेळी आपल्याला चांगला शोध लागला की आपण मोठा आत्मगौरव करतों. पण पूर्वेकडे तीन हजार