Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६ । केसरीची त्रिमूर्ति

शांत झाल्यावर गावांतून पळून गेलेले लोक परत येऊन सुखाने कांही काळ तरी राहत असत; पण आमच्या टेंपलसाहेबांनी आपल्या हिंदी प्रजेला परलोकचे दरवाजे खुले करून दिले आहेत ! अशा रीतीने सर्व प्रजा उत्सन्न झाल्यावर सर्व जमीन जरी सरकारने घशांत घातली तरी त्याला काय किफायत आहे ! अशा धोरणाने होईल काय ? जें राष्ट्र इंग्लिश लोकांचे पाय येथे लागण्यापूर्वी लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, वीरश्री इत्यादिकांनी युक्त होतें तेथे सारी नासाडी करून साहाराचें वाळवंट करून सोडलें, ही परम देदीप्यमान कीर्ति आमच्या श्वेतद्वीपीय बंधूंच्या वांटास येऊन तिचा ध्वज यावच्चंद्र दिवाकरौ फडकत राहील.
ख्रिश्चन नीतितत्त्वें ?
 प्रत्यक्षांत आचरण असें पेंढाऱ्यांचें लुटारूंचें, दरोडेखोरांचें असतांना स्वतःच्या धर्मांतील नीतितत्त्वांचा अभिमान मात्र आमच्या राज्यकर्त्यांना मोठा जाज्वल्य आहे. तो इतका की, हीं उदात्त नीतितत्त्वें जगांत ख्रिश्चन धर्मानेच प्रथम सांगितलीं अशी शेखी ते मिरवितात. पण हें तरी खरें आहे काय ? इंग्रज पंडितच काय म्हणतात ते पाहा. सुप्रसिद्ध इतिहासकार बकल म्हणतो, "नव्या करारांत एकहि नीतितत्त्व असे नाही, की जे पूर्वीच्या धर्महीन (पेगन- अख्रिश्चन) लोकांनी सांगितलें नव्हतें. बायबलमधील अनेक सुंदर वचनें म्हणजे पूर्वीच्या पेगन ग्रंथ- लेखकांचीं अवतरणें आहेत. यांत ख्रिश्चन धर्माला दूषण नसून भूषणच आहे. भिन्न युगांतील मानवांचीं नीतितत्त्वेंच आपण सांगतों हा गौरवच आहे, पण पूर्वी अज्ञात असलेली नीतितत्त्वें ख्रिश्चन धर्म सांगतो, असें जर कोणी म्हणत असेल, तर तो एक तर अज्ञ आहे किंवा लुच्चा तरी आहे." बकलच्या या उताऱ्याच्या जोडीला विष्णुशास्त्री यांनी प्रसिद्ध फ्रेंच तत्त्ववेत्ता व्हाल्टेअर याचा उतारा दिला आहे. तो म्हणतो, "अरे इतिहासपंडिता, तूं हें काय सांगत आहेस ? ख्रिश्चनच फक्त नीतिमान होते आणि पेगनांना नीति माहीतच नव्हती ? मग सॉक्रेटीस, चारोंडस, सिसेरो, एपिक्टेटस् आणि मार्कस् ऑर्लियस यांचें काय ?"
कृतघ्नता
 इंग्रज राज्यकर्ते व मिशनरी यांचें असें वस्त्रहरण केल्यानंतर विष्णुशास्त्री यांनी आपल्या काळच्या राजेरजवाड्यांचें, संस्थानिकांचें वर्णन केले आहे. त्यांचें सध्याचें दैन्य, लाचारी, हांजीखोर वृत्ति, नादानी, नालायकी यांचें त्यांनी वर्णन केलेंच आहे; पण त्याच्या आधी मराठ्यांच्या काळांत महादजी शिंदे, यशवंतराव होळकर हे राजे, सरदार कसे पराक्रमी होते आणि इंग्रजच त्यांच्यापुढे दर वेळी कसे नामोहरम होत असत, हे प्रथम सविस्तर सांगितलें आहे. कारण तोच त्यांचा प्रतिपाद्य विषय आहे. इंग्रज हा अजिंक्य नाही, दुर्जय नाही. त्याच्या ठायीं दैवी सामर्थ्य मुळीच नाही. त्याचा धर्म म्हणजे कांही अलौकिक आहे असें नाही. तो तुमच्या- आमच्या- सारखा सामान्य माणूस आहे. राग, लोभ, मोह, स्वार्थ, अनीति, असत्य यांना तो