Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक पाय तुरुंगांत । ३१

तेव्हा तर ते फारच संतापले. ते म्हणाले की, "हिंदुस्थानच्या व इंग्लंडच्या खऱ्या हितचितकांवर अशा रीतीने उलटून पडणें हें आम्हा भेकड, लोभी, अविचारी व स्वार्थी हिंदु लोकांशिवाय कोणाच्यानेहि होण्यासारखें कर्म नाही. ह्यूमसाहेबांसारखी आमची आम्हांस काळजी असती, तर राजद्रोहाचा किंवा दुसरा कसलाहि आरोप आपणांवर आणून घेण्यास व त्याचे परिणाम साहण्यास आम्ही तयार झालों असतो. पण इतकें धैर्य आमच्या अंगीं असतें तर आमची सांप्रतची दास्यावस्था आम्हांस कोठून प्राप्त झाली असती !"
श्रमविभाग
 लो. टिळकांनी त्या पुढाऱ्यांवर अशीच टीका केली आहे. ते म्हणतात, "काँग्रेसच्या कार्यास धक्का येऊं नये एवढ्यासाठी तरी हे सर्क्युलर प्रसिद्ध होणे इष्ट नाही," असा कित्येक शाहण्या लोकांनी तर्क काढला आहे. आपला भित्रेपणा कसा झाकावा हें आम्ही फार चांगलें शिकलों आहों. राष्ट्रहितासाठी झटून कळकळीने व स्वार्थाकडे लक्ष न देतां मेहनत करण्याचा मक्ता आम्ही ह्यूमसाहेबांवर सोपविला आहे. त्याने खुशाल मेहनत करावी व एखाद्या वेळी कडक सर्क्युलर काढलें तर आम्ही त्याचा भिऊन निषेध करावा, असा त्याचा आमचा श्रमविभाग झाला आहे ! अशाने काँग्रेस ह्यूमसाहेबांच्या मागे कशी चालेल, याची आम्हांलाहि मोठी काळजी वाटतें."
पुढाऱ्यांची माघार
 यासंबंधी विवेचन करतांना पुढे लाला लजपतराय यांनी नेमस्त प्रागतिक नेत्यांविषयी हेंच मत दिलें आहे. ते म्हणतात, "इंग्लंडांतील चळवळ पैशाच्या अभावी फसली आणि हिंदुस्थानांतील चळवळ चिकाटी, जोम, आणि कळकळ यांच्या अभावीं ढासळली. या बाबतींत आमचें असें मत आहे की, ह्यूमसाहेबांनी पुढे जें धोरण स्वीकारलें तें स्वतःच्या बुद्धीच्या निर्णयानुसार स्वीकारलें नसून तें स्वीकारण्यास हिंदी पुढाऱ्यांची भीति व अंगचुकारपणा यांचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम हाच त्यांस कारण झाला असावा. हिंदी पुढाऱ्यांनी आपलीं हत्यारें खाली ठेवली नसती तर देशाने त्यांना पैशाचा पुरवठा केला असता, आणि त्यांच्या निशाणाखाली राष्ट्र गोळा झालें असतें. सरकारने ही चळवळ कदाचित् दडपून टाकली असती, पण तोच मोठा विजय ठरला असता. आणि १९०९ साली जें मिळालें तें कदाचित् दहा-वीस वर्षे आधी मिळालें असतें. पण हिदी पुढाऱ्यांना वाटलें की, आपल्या अंगीं पुरेसें सामर्थ्य नाही, म्हणून त्यांनी माघार घेतली व हें नवें राजकीय हत्यार फेकून दिलें." (कित्ता).
सर्वस्वत्यागाची परंपरा
 विष्णुशास्त्री यांनी एक निराळी पीठिका, निराळी परंपरा निर्माण केली म्हणजे काय तें यावरून ध्यानांत येईल. क्रांतीच्या आधी क्रांतीचें एक तत्त्वज्ञान सिद्ध होत असतें. दलित, पीडित जनतेंत त्यामुळे प्रतिकारशक्ति निर्माण होते. अस्मितेची जाणीव याचा हाच अर्थ आहे. माझा आत्मा व परमात्मा एकच आहेत, मी परब्रह्मच