Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२६ । केसरीची त्रिमूर्ति

एका फ्रेंच ग्रंथकाराने 'जगाचा इतिहास' या नांवाने एक इतिहास लिहिला आहे. त्यांत ज्यू लोक यांचाच प्रामुख्याने इतिहास देऊन इतरांना अगदी गौण लेखिलें आहे. त्यावर टीका करतांना एक नामांकित इंग्लिश इतिहासकार लिहितो, "या जगाच्या इतिहासांत लेखकाने हिब्रू लोकांनी ज्यांच्यापासून संकृतीची शिकवण घेतली त्या पर्शियन व इजिप्शियन लोकांना तर वगळलेच आहे. पण त्यांच्याहिपेक्षा अतिशय श्रेष्ठ असे सिंधु व गंगा यांच्या काठचे लोक त्यांनाहि वगळले आहे. त्यांचें तत्त्वज्ञान इतकें उदात्त होतें की, युरोपियांचें सर्व अध्यात्मज्ञान त्यांत पूर्वीच येऊन गेलें आहे. आणि ज्यू जेव्हा भटक्या जंगली अवस्थेत होते तेव्हा अत्यंत उदात्त ज्ञानविद्या जोपासून त्यांनी तो आपल्या अमृतमधुर भाषेत ग्रथितहि करून ठेविली होती."
 प्रसिद्ध संस्कृत पंडित कोलब्रुक, इतिहासकार ओक्ले, सर जॉन मालकम, सर जेम्स मॅकिंटाश, यांसारखे इंग्लिश अधिकारी अशा अनेक पंडितांची अशींच अवतरणे देऊन विष्णुशास्त्री यांनी इंग्लिश मिनशरी, इंग्रज पंडित व इंग्रज राज्यकर्ते या तीन धूर्तांनी हिंदी जनांना भग्नतेज करण्याचा जो डाव रचला होता तो उलटवून त्यांच्या मनाला येणारी मरगळ झाडून टाकली व या भूमींत नवें चैतन्य निर्माण केलें.