स्वभाषा, स्वधर्म, स्वदेश । २५
समाजांत ख्रिस्ती धर्मांतील अनेक विधींचा अंतर्भाव केला आणि ख्रिस्ती लोकांचा त्रिमूर्तिवाद समाजाच्या मूलतत्त्वांत प्रविष्ट केला. ख्रिस्ती मिशनरी या सर्वांचा फार विचित्र अर्थ करीत असत. हे नव्या पंथाचे लोक स्वधर्माला विटले असून ते लवकरच ख्रिश्चन होतील, असा प्रचार ते करीत. ('प्रार्थनासमाजाचा इतिहास', पृ. ४६). स्वत्वरक्षणास उद्युक्त झालेले विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना हीच भीति होती. अशी भीति केवळ चिपळूणकरांनाच वाटत होती असें नव्हे. राजारामशास्त्री भागवत हे सुधारकच होते. त्यांनीहि, ख्रिस्ती धर्माच्या नमुन्यावर हा नवा नंदादीप पाजळला, अशी समाजाच्या संस्थापकांवर उघडपणे टीका केली होती. 'ज्ञानप्रकाश' हें पत्र सुधारकी वळणाचें असूनहि त्याने प्रार्थनासमाज स्थापन झाला तेव्हा लगेच त्यावर अशाच प्रकारचा आरोप केला होता. आज आपण शंभर वर्षांनी शांतपणें त्या काळचा विचार करीत आहोंत. पण आक्रमक असे मिशनरी व इंग्रज राज्यकर्ते आणि हिंदु धर्म व हिंदु संस्कृति यांच्यांत त्या वेळीं मोठा संग्राम सुरू झाला होता. तो युद्धकाळ होता. युद्धकाळांत शत्रूच्या गौरवाचा व स्वकीयांच्या अधिक्षेपाचा नुसता वास जरी कोठे आला तरी त्याच्यावर लोक खवळून उठतात; आणि तसें खवळणें अवश्यच असतें. तीच भावना विष्णुशास्त्री यांची होती. म्हणून ख्रिश्चन वळणावर जाणाऱ्या पंथांवर ते तुडून पडत होते.
परंपराभिमान
स्वत्वाचा तिसरा घटक म्हणजे स्वदेश. स्वदेशाचा अभिमान म्हणजे आपल्या प्राचीन संस्कृतीचा, प्राचीन परंपरेचा अभिमान, आपल्या पूर्वजांच्या बहुविध कर्तृत्वाचा अभिमान होय. मागे सांगितलेच आहे जितांचा हा अभिमान नष्ट करावा असा जेत्यांचा नेहमीच प्रयत्न असतो; आणि त्याप्रमाणे इंग्रज पंडितांनी गेल्या शतकांत तसे पराकाष्ठेचे प्रयत्न चालविले होते. या पंडितांच्या आघाताचें निवारण करून त्यांच्यावर तसाच जबर प्रत्याघात करणें हें निबंधमालेचें एक प्रधान उद्दिष्ट होतें. आम्हांला इंग्रजांचें गुरुत्व पतकरण्याचें मुळीच कारण नाही हें सांगतांना व्यास, वाल्मीकि, कालिदास, कपिल, पाणिनि, आर्यभट्ट, भास्कराचार्य, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, चंद्रगुप्त, पोरस, शिवाजी, बाजीराव, माधवराव, महादजी, यशवंतराव होळकर, रणजितसिंग, रमाबाई, अहल्याबाई, लक्ष्मीबाई, नाना, तात्या टोपे अशा अनेक स्त्री-पुरुषरत्नांचीं नांवें सांगून कर्तृत्वाच्या सर्व क्षेत्रांतील गुणसंपदा जोपासण्याची ऐपत आम्हां हिंदुधर्मीयांत आहे, असें विष्णुशास्त्री यांनी वारंवार आवर्जून सांगितलें आहे.
डाव उलटविला
शिवाय हा आपला सिद्धान्त जास्त दृढ व विवादातीत करून टाकण्यासाठी अनेक युरोपीय पंडितांचे आधार देऊन भारतीय संस्कृतीचे निंदक जे पाश्चात्त्य पंडित त्यांना त्यांच्याच जातभाईंकडून त्यांनी प्रत्युत्तर देवविलें आहे. बॉसेट नांवाच्य