Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४ । केसरीची त्रिमूर्ति

केलें होतें; पण पैसा, सत्ता, विद्वत्ता या सर्व दृष्टींनी मिशनऱ्यांचे बळ फार मोठें होतें, त्यामुळे त्यांचे हिंदु धर्म-निंदेचें व धर्मांतराचें कार्य अविरतपणें तसेंच चालू होतें. म्हणूनच विष्णुशास्त्री यांनी मिशनऱ्यांविरुद्ध सतत शस्त्रसंधान चालविलें होतें. त्यांतील ख्रिस्ती धर्माचें जें विदारण त्यांनी पाश्चात्त्य पंडितांच्या- ख्रिस्ती पंडितांच्याच आधारें केलें त्याचा विचार पुढे करावयाचा आहे. येथे भाषेचे महत्त्व सांगतांना त्यांनी जो मुद्दा मांडला तसा धर्मचर्चेच्या सदर्भात मांडलेला मुद्दा पाहूं. विष्णुशास्त्री म्हणतात की, "प्राचीन काळी याच धर्माच्या आश्रयाने येथल्या लोकांनी अलौकिक व दिव्य असें कर्तृत्व प्रगट केलें होतें. वाल्मीकि, पाणिनि, कालिदास, आर्यभट्ट हे सर्व हिंदु धर्माचे पुरुष होते. विक्रमादित्य, पोरस, शिवाजी, बाजीराव यांनी हिंदु राहूनच दिग्विजय केला. तुकाराम, रामदास, यांसारखे थोर धर्मवेत्ते याच धर्मांत निपजले ! तेव्हा यापुढे प्रगति करण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा अवलंब करणें अवश्य आहे हा विचार कमालीच्या मूर्खपणाचा आहे. त्यांतून हिंदु धर्मांत कांही हीण मिसळलें असेल तर तें काढून टाकून धर्मसुधारणा करण्यास कसलाच प्रत्यवाय नाही." मराठी भाषेत सुधारणा करण्यास ज्याप्रमाणे शास्त्रीबुवांचा विरोध नव्हता तसाच धर्मसुधारणेसहि नव्हता. परदेशगमनास पूर्वी बंदी होती. पण १८५७ चे वीर अफगाणिस्तान, इराण, माल्टा येथे गेलेच होते. राघोबादादांचा वकील इंग्लंडला गेला होता. पेशव्यांनी सर्व हिंदुस्थानभर संचार केला तेव्हा 'न नीचो यवनात् परः ।' हें वचन उराशी बाळगलें नव्हतें. हीं उदाहरणें देऊन शास्त्रीबुवांनी म्हटले आहे की, सुधारणा होण्यास हिंदु धर्म बाधक आहे ही समजूत अगदी चुकीची आहे.
ख्रिश्चन वळण
 हिंदु धर्मांत सुधारणा करण्यास कसलीच हरकत नव्हती, तर विष्णुशास्त्री यांनी ब्राह्मोसमाज व प्रार्थनासमाज या पंथांवर टीका कां केली, असा प्रश्न येतो. ते पंथ तर हिंदु धर्मांत राहूनच सुधारणा करण्याचे प्रयत्न करीत होते. याचे उत्तर असें की, त्या पंथांनी व विशेषतः प्रार्थनासमाजाने ख्रिस्ती धर्माच्या वळणावर कांही आचार सुरू केले होते. समाजाच्या उपासना रविवारी होत आणि कांही प्रार्थना इंग्रजीतून होत. उपासनेला कधी कधी बायबलचा आधार घेतला जात असे; आणि एकंदर उपासनेचें स्वरूप चर्चमधील उपासनेसारखे दिसत असे. आज हे आक्षेप अगदी बालिश व पोकळ असे वाटतील हें खरें आहे; पण मिशनरी व इंग्रज पंडित यांचे रानटी हल्ले ज्या वेळी चालू होते, सरकारचा त्यांना ज्या वेळीं पूर्ण पाठिंबा होता, आपल्यांतलेच कांही लोक धर्मांतर करून ख्रिस्ती कळपांत जाऊन हिंदु धर्माच्या निंदेस उद्युक्त झाले होते, त्या वेळीं या नव्या पंथामुळे ख्रिस्ती धर्माकडे लोकांची ओढ होईल अशी भीति वाटणे साहजिक होतें. ब्राह्मोसमाजाचे प्रसिद्ध अनुयायी केशवचंद्र सेन यांनी पुढे त्याच वळणावर आपल्या समाजाला नेलें. त्यांनी आपल्या नवविधान