आत्मप्रत्यय । १५
आणि विशेषत: महाराष्ट्र त्यांचा कायमचा ऋणी राहील. पण असे असले तरी विष्णुशास्त्री आणि त्यांची निबंधमाला यांचें अनन्यत्व शिल्लक राहतेंच. गेल्या शतकांतील महाराष्ट्राच्या इतिहासांत त्यांचें स्वतंत्र असें स्थान निश्चितच आहे. तें कोणतें ?
ब्रिटिशांवर विश्वास
या दृष्टीने पितामह दादाभाई नौरोजी यांचा विचार करू. १८४८ पासून अनेकविध मार्गांनी ते समाजसेवा करीत होते. 'ज्ञानप्रसारक सभा', 'बाँबे असोसिएशन' अशा अनेक संस्था आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्थापून दादाभाई त्यांमध्ये अविरत कार्यमग्न असत; पण त्यांचें खरें महत्कार्य म्हणजे त्यांनी इ. स. १८७१ सालीं विलायतेंतील 'ईस्ट इंडिया फिनॅन्स कमिटी' पुढे साक्ष देऊन इंग्रजी राज्याचें खरें स्वरूप हिंदी जनतेला दाखवून दिले; त्या परकीय सत्तेचें कृष्ण अंतरंग लोकांच्या लक्षांत आणून दिलें, हें होय. पगाराच्या रूपाने, व्यापारी नफ्याच्या रूपाने, अघोरी करांच्या रूपाने ब्रिटिशांनी भारताचा रक्तशोष चालविला होता. महंमद गझनीने अठरा स्वाऱ्या करून जितकी संपत्ति लुटली तितकी इंग्रज एका वर्षांत भारतांतून लुटून नेतात, त्यांचें साम्राज्य हिंदी लोकांच्या पैशावर व रक्तावर उभारलेले आहे, त्या रक्तशोषणामुळे हिंदुस्थान मृत्युपंथास लागला आहे, असें अत्यंत स्पष्ट व परखड भाषेंत, दादाभाईंनी आपल्या साक्षीत प्रतिपादन केलें आणि तेंहि इंग्लंडमध्ये व इंग्रज सभासदांच्या तोंडावर ! दादाभाईंचें हें कार्य अपूर्व असेंच आहे; पण अशा तऱ्हेने ब्रिटिश साम्राज्यशाहीचें राक्षसी रूप लोकांना दाखवून दिल्यानंतरहि, आपला ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरचा विश्वास ढळला नाही, असें ते त्यानंतर सतत सांगतच राहिले !
१९०६ सालच्या काँग्रेसच्या अधिवेशनांत त्यांनी 'स्वराज्य' मंत्राचा संदेश दिला आणि त्या स्वराज्याच्या प्राप्तीसाठी हिंदुस्थानच्या कोनाकोपऱ्यांत, 'चळवळ करा, सतत चळवळ करा', असा लोकांना उपदेश केला. पण ती चळवळ म्हणजे काय ? ब्रिटिशांच्या पुढे आपली गाऱ्हाणी मांडणें ! (ॲजिटेट मीन्स इन्फॉर्म). "भारतीयांना आपल्या हक्कांची जाणीव करून द्या व ब्रिटिशांना त्यांनी ते हक्क कां दिले पाहिजेत, तें समजावून द्या. आपण जर गप्प बसलों तर त्यांना वाटेल की, हे लोक संतुष्ट आहेत. म्हणून ब्रिटिशांना आपल्या तळमळीची जाणीव करून द्या." १९०६ सालच्या काँग्रेसमधील भाषणांत त्यांनी पुनः पुन्हा सांगितले की, "ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवरील माझा विश्वास उडालेला नाही." ते म्हणाले, "प्रयत्नांना आरंभ केल्यापासून मी इतक्या वेळा निराश झालों आहें की, दुसऱ्या एखाद्याचें काळीज फुटून गेलें असतें व त्याने बंड उभारलें असतें; पण चिकाटी हा माझ्या जीवनाचा धर्म असल्यामुळे मी हताश झालों नाही." ('आधुनिक भारत,'- जावडेकर, पृ. ११४). ज्याने ब्रिटिशांचे काळेकुट्ट राक्षसी रूप स्पष्ट करून दाखविलें